Beed : जिल्ह्यातील पिकविम्यासंदर्भात आज राज्य शासनाचा आदेश निघणार – पालकमंत्री मुंडे

0
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झाला निर्णय, विम्याचा हफ्ता भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत,
मुदत वाढविण्यासाठी केंद्राकडे मागणी – धनंजय मुंडे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, पुढील तीन वर्षांसाठी पिकविम्याच्या प्रश्न मिटला आहे. शेतकऱ्यांना आपल्या खरीप पिकांचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भरता येणार असून त्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. या बैठकीस मुंडे यांच्यासह कृषिमंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी सचिव एकनाथ डवले तसेच कृषी आयुक्त उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० – २१ साठी कोणत्याही पीकविमा कंपनीने निविदा न भरल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ना. धनंजय मुंडे यांनी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे याबाबत मागणी व पाठपुरावा केल्याने केंद्रीय कृषी विभागाकडून ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी या कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी विशेष बाब म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित बँकांमध्ये आपल्या खरीप पिकांचा विमा भरावा, तसेच केंद्राने दिलेली ३१ जुलै पर्यंतची मुदत आणखी काही दिवसांसाठी वाढविण्याबाबत राज्य शासन केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर मुंडे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारकडून विमा भरण्याची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून त्याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांनी बँकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळून कोरोनाबाबत विशेष काळजी घेत आपल्या विम्याचे हफ्ते भरावेत, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच बीड जिल्ह्यातील पिकविम्याचा प्रश्न तीन वर्षांसाठी सोडवल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी विभागाचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here