Ahmednagar Corona Updates : लग्न आणि अंत्यसंस्कारामुळे रुग्णसंख्येत वाढ

जिल्ह्यात नवे साठ बाधित; एकाचा मृत्यूः भिंगार, पाथर्डीत आता उद्रेक

नगरः कोरोनाबाबत आज आलेल्या दोन अहवालात साठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाथर्डी आणि भिंगार हे कोरोनाचे नवे हाॅटस्पाॅट झाले आहेत. या दोन ठिकाणी लग्न आणि मयत या दोन कारणांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे नगरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत शहरात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर शहरातील केडगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नगर शहरात याआधी कापड बाजारातील व्यापारी व २४ वर्षीय मुलाचा कोरोना ने बळी घेतला होता. गंज बाजारातील ३५ वर्षीय युवा व्यापाराचाही कोरोनाने बळी घेतला होता. दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आईचा तर बालिकाश्रमरोड येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत आज सकाळी २१ जणांचे अहवाल होकारात्मक आढळून आले, तर काल रात्री उशिरा १८ जणांचे अहवाल होकारात्मक आले. यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५३४  झाली आहे.  दरम्यान, आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला. त्यात

अकोले एक, नगर ग्रामीण दोन, नगर शहर एक, पारनेर दोन, संगमनेर १५, श्रीरामपूर येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. जिल्ह्यात बरे होणा-या रुग्णांची संख्या आता ७९४ इतकी झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.  जिल्ह्यात ४९४ रुग्ण उपचार घेत आहेत.

पाथर्डीत आज सर्वाधिक 42 रुग्ण आढळले आहेत. यात पाथर्डीतील कोल्हुबाईचे कोल्हारमध्ये 11 रुग्ण आहेत. कोल्हुबाईचे कोल्हारमधील  रुग्णसंख्या वाढीमागे तेथील एक लग्न करणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. हे लग्न आठ-दहा दिवसापूर्वी झाले होते. या लग्नातील वराकडील पिता आजारी होता. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाली असल्याची चर्चा आता होत आहे. वराकडील कुटुंब हे सोनई (ता. नेवासे) येथील आहेत. मुलाचे लग्न डोळ्यादेखत पाहायचे, म्हणून पित्याचा अट्टाहास होता. त्यामुळे आजारपण झाकून ठेवून पित्याने मुलाच्या लग्नात हजेरी लावली. नातेवाइकांचे स्वागत केले. लग्न लावणारा आणि वराच्या पित्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची चर्चा गावात रंगली आहे. संसर्ग झालेल्या  व्यक्तींनी अहवाल येण्यापूर्वी काही सार्वजनिक कार्यालयांमध्येही हजेरी लावली आहे. यात बँक, सरकारी आणि खासगी कार्यालयांचाही समावेश आहे.

भिंगार येथील कोरोनाबाधित रुग्ण एका अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यांना तिथे कोरोनाची बाधा झाल्याचा संशय आहे. भिंगारला सकाळी आलेल्या अहवालात दहा जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर संध्याकाळी आलेल्या अहवालात आणखी ११ जण बाधित झाले.  आज सकाळी आलेल्या अहवालानुसार, पारनेर तालुक्यातील तीन (सोबलेवाडी एक, नांदूरपठार एक आणि पळसपूर एक). नगर ग्रामीणमधील तीन (वाकोडी एक, डोंगरगण एक), श्रीगोंदे तालुक्यातील पाच  (कोळगाव तीन, लोणी व्यंकनाथ दोन) अशा रुग्णांचे अहवाल होकारात्मक आले. त्यानंतर घारगाव येथेही आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली.  काल रात्री १८ जणांचे अहवाल होकारात्मक आले. त्यामध्ये संगमनेर १२ (कुरण दोन, राजापूर एक, बागवानपुरा चार, घुलेवाडी एक, सय्यदबाबा चौक तीन, सुकेवाडी एक), नगर शहर पाच, आणि अकोले एक (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.

जिल्हा पुरवठा विभागातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला असून दोन कर्मचाऱ्यांचे अहवाल  होकारात्मक आले. खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांच्या कालावधीसाठी पुरवठा विभागाचे कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे. त्याअगोदर जिल्हा परिषदेतील कर्मचा-याला कोरोना झाला.

दक्षतेचा उपाय म्हणून पुरवठा कार्यालयातील 30 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्त्राव तपासले आहेत. अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पाथर्डीत संपूर्ण बंद

कोरोनाचा विस्फोट झाल्याने पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी ४२ कोरोना बाधीत रुग्ण सापडले. पाथर्डी शहर अतिसंक्रमित क्षेत्र केले आहे.  तालुक्यातील त्रिभुवनवाडी, कोल्हार, आगखांड, पिपंळगावटप्पा, शिक्षक काँलनी, तिसगाव येथे रुग्ण सापडेलला भाग सील केला आहे.

सूर्यनगर आणि तारकपूर प्रतिबंधित क्षेत्र

सावेडीतील सूर्यनगर आणि तारकपूर या दोन ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने 30 जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. तारकपूर येथील सत्संग भवनाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here