Human interest Story : आत्महत्येचा प्रयत्न…ते आयएएसचे स्वप्न!

0

…राखेतून पुनर्जन्म घेणा-या फिनक्स पक्षाप्रमाणे 12 वीच्या परिक्षेत फर्स्ट क्लास येऊन त्याने गाठली यशाची पहिली पायरी

…आता घ्यायचीय गरूड झेप

वाचा हृदयस्पर्शी प्रेरणादायी कहानी

प्रतिनिधी | केशव कातोरे | राष्ट्र सह्याद्री

शब्दांकन : स्वाती राठोड

…असं म्हणतात फिनिक्स पक्षी हा राखेतून पुनर्जन्म घेतो. तर संपूर्ण पिसे आपल्याच नखांनी उपटल्यानंतर एकाच ठिकाणी स्थिर होऊन पुन्हा नवीन पंख येण्यासाठी वाट पाहतो. यामध्ये मोठा काळ जातो. पण पक्षीराज गरूड धीर सोडत नाही. अन् एके दिवशी त्याला नवीन पंख फुटतात. तो हळूहळू हालचाल करू लागतो. आणि पंखांमध्ये बळ येताच पुन्हा आकाशात उंचच उंच झेपावतो. यालाच म्हणतात घे गरूड भरारी. अशीच एक भरारी श्रीगोंद्यातील एका बारावीतील विद्यार्थ्याने घेतली. त्याचे नाव अक्षय शिंदे.

अनेक संकटे, अडथळे पार करत अक्षयने अखेर 12 वीची परीक्षा दिली. आणि तो बारावीत 61 टक्के गुणांनी पास झाला. तसे पाहिले तर ज्यांना अक्षयचा भूतकाळ माहित नाही ते म्हणतील काय साधारणच तर पास झालाय त्यात काय विशेष. इथेच सांगावसं वाटतं विशेष किती गुण मिळविले यात नाही. तर कोणत्या परिस्थितींना तोंड देत अक्षयने हे यश मिळवले हे महत्वाचे. जेव्हा अपयशाने मनाला संपूर्ण घेरले असते जीवन नकोसे वाटते. पण ईश्वराला मृत्यू मान्य नसतो. दुनिया में आए है तो जीनाही पडेगा जहर है जीवन तो पीनाही पडेगा… अशा मनस्थितीत मृत्यूची याचना करीत जीवन जगताना. कोठून तरी जीवन हे किती सुंदर आहे याची जाणीव करून देऊन पुन्हा निराशेतून जीवन हेच सत्य आहे आणि त्याला सुंदर बनवणे आपल्या हातात आहे हे समजते. पुन्हा झटून कामाला लागतो. तेव्हा मिळालेले छोटेसे यशदेखील उंच वाटायला लागते. आणि यशाच्या पुढच्या पायरीकडे जाण्यास प्रेरित करते. असाच काहीसा प्रवास बारावीत 61 टक्के मिळविणा-या अक्षयचा आहे. वाचा अक्षयचा हा प्रवास…

अक्षय अनिल शिंदे हा श्रीगोंद्यातील म्हातार पिंप्री येथे राहणारा. घरची परिस्थिती अगदी बेताची. आई-वडील यांच्या सतत भांडणे. त्यातून वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे ते असून नसल्यासारखे. आणखी एक लहान भाऊ पण त्यासोबत कधीही अक्षयला जुळवून घेता आले नाही. शिकण्याची इच्छा मनात होती. पण या परिस्थितीमुळे सतत वस्तीगृहात राहून शिकत असे. घरी भांडणं झाली तर पुन्हा घरी यावे लागे. असेच करता-करता कसे-बसे नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण कमी गुण मिळाल्याने स्वतःवरचा विश्वास हरवला होता. त्यामुळे विष पिऊन थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याला जाग आली तेव्हा तो रुग्णालयात होता. आपण जीवंत आहोत यावर त्याचा विश्वासच नव्हता. पण कसेबसे या परिस्थितीतून बाहेर पडला. दहावीची परीक्षा दिली. पुन्हा अपयश पदरी पडले. दहावीत गणितात नापास झाला. आता काय? पुन्हा आत्महत्येचे विचार डोक्यात घुमू लागले.

मात्र, यावेळी थोडा धीर धरला. पुढच्या शिक्षणासाठी आणि कामासाठी अहमदनगर गाठले. छोटी-मोठी कामे केली. परंतू यात पुन्हा दोन वर्षे वाया गेली. अशातच स्नेहालय संस्थेची ओळख झाली. स्नेहालयासोबत त्याने काम करायचे ठरवले. मात्र पुन्हा आयुष्यात अशा काही चुका झाल्यात की पुन्हा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा विष पिऊन घेतले. मात्र स्नेहालयातील कर्मचा-यांच्या वेळीच लक्षात आले त्यांनी तातडीने रुग्णालयात नेऊन त्यावर उपचार केले. दैव पाहा अक्षयला जीवन नको होते. पण दैवाला अक्षयचा मृत्यू नको होता. तो पुन्हा बचावला. पण यावेळेस मात्र अक्षयचा खरोखरच पुनर्जन्म झाला.

स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी त्याला जीवन हे अनमोल आहे. वारंवार मिळत नाही. मिळालेल्या पुनर्जन्म घालवू नकोस पुन्हा नव्याने उभारी घे, असे मार्गदर्शन करून त्याचे मन वळवले. तो मूळचा श्रीगोंद्याचा म्हणून त्याला कुलकर्णी यांनी
महामानव बाबा आमटे संस्था, श्रीगोंदा (विकास पाटील मो.9881523733), येथे राहून शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. या सगळ्यातून अक्षयचे मन वळाले. पुन्हा आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचे त्याने ठरवले.

महामानव बाबा आमटे विद्यार्थी सहायक समिती संस्थेत तो 16 जून रोजी दाखल झाला. तेथे त्याला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन मिळाले. संस्थेने सुरुवातीला त्याला आयटीआयसाठी प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दहावीला गुण कमी असल्याने मिळाले नाही. त्यानंतर एस एन गुगळे कॉलेज येथे अकरावीला प्रवेश मिळाला.

कॉलेजमधील आगळे सर हे संस्थेशी परिचित असल्याने त्यांनी अक्षयचे 11 वी आणि 12 वी चे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. सोबत अक्षयची भगवान काळे सर, अश्विनी बारबोले मॅडम आणि अक्षय लाधे सर, होले मामा यांच्याशी ओळख झाली. हळूहळू तो संस्थेची छोटी छोटी कामे करू लागल. झालेल्या दुःखाला विसरून तो आता नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करत होता.

आत्मविश्वास गमावून बसलेला अक्षय भविष्याची स्वप्ने पाहत वाटचाल करत असताना इयत्ता 11 वी मध्ये कला शाखेत कॉलेजमध्ये प्रथम आला. याचा सर्वांना खूप आनंद झाला. तो नेहमी सांगतो स्नेहालय परिवार आणि बाबा आमटे संस्थेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि आता मागे वळून पाहायचे नाही पुढे जायचे लढायचे असे ठरविले.

यातून डॉ. मृणालिनी राडकर ताई (अमेरिका) यांची अक्षयशी ओळख झाली. डॉ. मृणालिनी या डॉक्टर आहेत. त्या अमेरिकेत असतात. त्यांनी बाबा आमटे संस्थेच्या मुलांसाठी दररोज वेगवेगळे क्लास घेत असतात. दैनंदिन शिक्षणाबरोबरच अवांतर गोष्टीही त्या मुलांना सांगतात. अक्षय पण त्यांचा रोज क्लास करू लागला. क्लासमधून त्याचा आत्मविश्वास वाढला. आणि नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परीक्षेत अक्षय 61% मिळवून उत्तीर्ण झाला. त्र अक्षय आता प्रत्येक दिवसाचा आनंद घेत आहे. डॉ. गिरीश कुलकर्णी सर, अनंत झेंडे सर डॉ. मृणालिनीताई राडकर हे सर्व देवरूपी मिळाले म्हणून आयुष्याचे महत्व कळले असे तो मानतो. पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्याला पोलीस अथवा स्पर्धा परीक्षेतून अभ्यास करून देशाची सेवा करायची आहे. शिवाय त्याच्याप्रमाणे अडचणी असलेल्या युवकांना नवीन दिशा द्यायची आहे. असे तो आवर्जून सांगतो.

त्यामुळेच अक्षयचे हे यश राखेतून पुनर्जन्म घेणा-या त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पंख झडून एकांतात दिवस काढत नवीन पंखांची वाट पाहत पंख आल्यानंतर पुन्हा आकाशात उंच भरारी घेणा-या गरुडाप्रमाणे आहे. अक्षयला मार्गदर्शन करणा-या प्रत्येकाला त्याच्या या यशाचा परमोच्च आनंद झाला. खरतर विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आणि आता सर्व संपले आहे असा विचार करणारा हाच तो अक्षय होता का ? असा प्रश्न पडतो.

पुनर्जन्म काय असतो हे मी अनुभवतोय… तू फक्त लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हे डॉ. गिरीश कुलकर्णी सरांचे शब्द मला जगण्याची प्रेरणा आणि नवी उमेद देत आहे.
– अक्षय शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here