Shevgaon : मोफत युरिया वाटपातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न – इंजि. सुधिर शिरसाठ

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – सुराज्य रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने गोर गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना उज्वला युरिया खताचे मोफत वाटप करून कोरोना लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे. असे प्रतिपादन सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. सुधिर शिरसाठ यांनी केले.
खा.सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेवगाव तालुक्यातील वडुले, वाघोली, ढोरजळगाव, निंबेनांदूर, गरडवाडी, मळेगाव, सामनगाव, आव्हाणे, चव्हाणवाडी, अमरापूर, दिंडेवाडी, या ११ गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति शेतकरी २ गोण्या युरिया खताचे वाटप करण्यात आले. शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले, ढोरजळगावचे सरपंच डॉ.सुधाकर लांडे, ए. डी. सी.सी.बँकेचे तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, राजेंद्र देशमुख, रोहन साबळे, दिगंबर देशमुख, शहादेव खोसे, संदिप बडे, संकेत वांढेकर, कृष्णा सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.
सध्या सर्वत्र युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसला आहे. या संकटात गरीब शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम प्रतिनिधीक स्वरूपात केले आहे. लवकरच वडुले परिसरातील १० गावातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दरात युरिया खत मिळवून देण्याची व्यवस्था सुराज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार असून वडुले पंचक्रोशीतील गावांना युरियाची टंचाई भासू देणार नाही अशी ग्वाही इंजि. सुधिर शिरसाठ यांनी दिली.
केंद्राकडून राज्याला होणारा युरिया खताचा पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळे राज्यात मागणी तेव्हढा युरिया खताचा पुरवठा होत नाही. त्यामुळे केंद्राकडून पुरेशा प्रमाणात युरिया खताचा पुरवठा व्हावा, अशी मागणी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी दिली.
मोफत खत वाटपासाठी सुराज्य फाउंडेशन चे मुकेश आंधळे, सागर आव्हाड, स्वप्नील सानप, पांडुरंग आव्हाड, अर्जुन आव्हाड, सुभाष आव्हाड, सागर आंधळे, शुभम सानप, अक्षय आव्हाड, अमोल आव्हाड, प्रशांत आंधळे, नवनाथ आव्हाड, पांडुरंग नागरे, भगवान आव्हाड, चंद्रकांत रणमले, अमृत मुंडे आदींनी परिश्रम घेतले.
प्रत्येक गावातील लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून मास्क व सॅनिटायझर चा वापर तसेच सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here