Karjat : कोरोना साखळी मोडित काढण्यासाठी गटविकास अधिका-यांची नियुक्ती

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : दोन तीन दिवसात कर्जत शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्या अनुषंगाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी गटविकास अधिकारी कर्जत यांची ग्रामीण भागासाठी विशेष नियुक्ती केली आहे. यासह त्यांनी आपल्या पातळीवर भरारी पथके नियुक्त करून तालुक्यात विशेष दक्षता घ्यावी, असे आदेश शनिवारी रात्री पत्रकाद्वारे दिले आहेत.

बुधवारी कर्जत शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्यापाठोपाठ नांदगाव, माहीजळगाव आणि पुन्हा शहरात कोरोना रुग्ण सलग मिळाल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि साखळी मोडीत काढण्यासाठी इन्सिडेंट कमांडर तथा कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी गटविकास अधिकारी कर्जत यांची ग्रामीण भागासाठी विशेष नियुक्ती केली आहे. कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील कोणतेही दुकान, आस्थापना सायंकाळी पाचनंतर सुरू राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.
यासह सामाजिक अंतरपथ्याचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य करावे. कुठल्याही दुकानासमोर अनावश्यक गर्दी दिसल्यास ते दुकान सील करण्यात येईल. तसेच सदर दुकानादारावर – आस्थापना प्रमुखावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात भरारी पथके तयार करावेत आणि या पथकामार्फत कारवाई करण्यात यावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक बाबीशिवाय हालचाली केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
तसेच कर्जत तालुक्यातील गावांमध्ये कोणत्याही बाहेर गावावरून प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता व आरोग्य तपासणी न करता गावात प्रवेश केल्यास सदर व्यक्ती आणि त्यास आसरा देणाऱ्या व्यक्ती या दोघांवरही आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८,२६९, २७० अन्वये आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेश शनिवार दि १८ जुलै रोजी काढलेला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरीकांनी काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here