Kada : कड्यात वैद्यकीय अधिका-यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ?

3
प्रतिनिधी | राजेंद्र जैन | राष्ट्र सह्याद्री 
असंतोषी अधिकारी, पुढा-यांची खेळी; डाॅक्टरांसाठी ग्रामस्थांकडून  आंदोलनाचा संकेत
एक वर्षापूर्वी ज्या सरकारी दवाखान्याला केवळ डाॅक्टर अभावी उतरती कळा आली होती. अनेक आजारावर रुग्णांना एकच गोळी मिळायची, दैनंदिन बाह्य रुग्णसंख्या पंचवीसच्या वरती कधी ढळली नाही. अशा मरगळ आलेल्या कडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ज्या वैद्यकीय अधिका-यांनी अवघ्या काही महिन्यात नवसंजीवनी दिली. दवाखान्याचा चेहरामोहरा बदलला, त्याच डाॅक्टरांची असंतोषी अधिकारी, पदाधिका-यांना अॅलर्जी होऊ लागली आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या बदलीसाठी अंधारातून हालचाली होऊ लागल्यामुळे एका चांगल्या वैद्यकीय अधिका-यांची बदली केल्यास थेट रस्त्यावर उतरण्याचा संकेत कडेकरांनी दिला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एक वर्षापूर्वी पुरती मरगळ आली होती. मधल्या काळात याठिकाणी एकही कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे दवाखान्यातील गैरसोय रुग्णांसाठी कायम जीवघेणी ठरत होती. त्यामुळे याठिकाणी गोरगरीब रुग्णांची हेळसांड नित्याचित होत असायची. याबाबत काही पत्रकारांनी सतत प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोयीचा पंचनामा चव्हाट्यावर आणल्यामुळे अखेर आरोग्य विभागाला उशिरा का होईना जाग आली. अन् त्यानंतर मागील वर्षी आॅगष्टमध्ये कडा प्रा. आ. केंद्राचा डाॅ. नितीन मोरे, डाॅ. अनिल आरबे यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला. मात्र तोही जाणीवपुर्वक तात्पुरताच होता. परंतू अवघ्या काही महिन्यात या वैद्यकीय अधिका-यांनी आपले कौशल्य पणाला लावून रात्रंदिवस रुग्णसेवा करून अक्षरश: सरकारी दवाखान्याचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
हेच डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी कडा परिसरातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी देवदूत ठरु लागले. ज्या दवाखान्यात उपचारासाठी दररोज पंचवीस रुग्ण यायचे, त्याच दवाखान्यात बाह्य रूग्णांची दैणंदिन संख्या शेकडोनी वाढली आहे. दवाखाना परिसरात डाॅक्टर, कर्मचा-यांनी स्वत: खड्डे खोदून वृक्षारोपण केले, प्राणी, पक्षांसाठी पानवठा बांधला. वाहन पार्किंगची व्यवस्था केली. सीसीटीवी कॅमेरे लावले, विद्युत रोषणाई केली. रुग्णांना आरोग्यसेवेची माहिती मिळावी, म्हणून साऊंड सिस्टीम कार्यान्वित केली. या अनोख्या लोकोपयोगी कार्याबदल विविध सामाजिक संघटनांकडून प्रशस्तीपत्र देऊन डाॅक्टरांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे अल्पकाळात कड्याचा सरकारी दवाखाना रुग्णांसाठी वरदान ठरला असतानाच, येथील कर्तृत्वान  डाॅक्टरांच्या कार्याची नेमकी कुणाला अन् कशासाठी अॅलर्जी झाली आहे, हा विषय सध्या कडेकरांसाठी संशोधनाचा बनला आहे.
एवढे नेत्रदीपक काम करूनही त्याच डाॅक्टरांची कड्यातून बदली करण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. काही असंतोषी अधिकारी, पदाधिकारी अंधारातून हालचाली करित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कडा ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. एखाद्या चांगल्या वैद्यकीय अधिका-यांची बदली केल्यास लोकशाही पद्धतीने थेट रस्त्यावर उतरण्याचा संकेत कडेकरांनी दिला आहे.
डाॅक्टरांचं कार्य कौतुकास्पद
कडा प्राथमिक आरोग्य केद्राचा पदभार घेतल्यापासून येथील वैद्यकीय अधिका-यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून अल्पकाळातच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं कड्यासाठी मोठे योगदान व कौतुकास्पद कार्य आहे. त्यामुळे अशा डाॅक्टरांची बदली केल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात येईल.
– बंटी गायकवाड, प्रशांत देशमुख ( ग्रा.प. सदस्य कडा)

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here