भास्करायण | आमचंही स्मारक झालंच पाहिजे!

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )

जन हो, आमचं बी स्मारक झालं पाहिजे! स्मारकांची वेटिंग लिस्ट बघता, भविष्यात आमच्या स्मारकाला जागा मिळेल की नाही, याची गॅरंटी नाही. त्यामुळे आम्ही जितेपणीच आमचं स्मारक व्हावं, अशी मागणी मायबाप सरकारकडे करीत आहोत. सरकारने आमची मागणी मान्य करावी. त्यासाठी अधिसूचना कायद्यात बदल, घटनादुरुस्ती काय आवश्यक असेल ते करावं. आमचं स्मारक मात्र झालंच पाहिजे!

यावर सरकार आम्हाला स्मारकं महात्मे, महापुरुष, थोर व्यक्तींची होतात, असा उपदेश करील. जे स्मरणात राहातील त्यांच्या स्मरणार्थ स्मारक असतात, असंही सांगेल. उठसूठ कोणाचीही स्मारक बांधली जात नाहीत. त्यासाठी आयुष्यभर झिजावं लागतं. कतृत्व दाखवावं लागतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, यांचं स्मारक करा अशी कोणीतरी मागणी करावी लागते. तुमच्याबाबतीत असा काहीच प्रस्ताव नसल्याने तुमची मागणी फेटाळली जात आहे, असं सरकार म्हणेल. तुमचं कतृत्व काय म्हणून तुमचं स्मारक व्हावे, असा प्रश्नही केला जाईल. या सगळ्या प्रश्नांना आमच्याकडं उत्तर आहे. त्याचं असं आहे, स्वातंत्र्य मिळून ञ्याहत्तर वर्षे झालीत. त्याची ‘स्वातंत्र्य सत्तरी’ आम्ही येथे सादर करतो. ही ‘स्वातंत्र सत्तरी’ वाचली, तर आमचं स्मारक होणं किती गरजेचं आहे ते कळेल.एक विनवणी आहे. भावनेच्या भरात आमच्या स्मारकासाठी ‘जागा बळकाव’ आंदोलन करु नका. त्यासाठी आम्ही आमच्या योग्यतेनुसार जागा ‘राखीव’ करुन ठेवलीय! ते स्वातंत्र सत्तरीच्या शेवटी आम्ही जाहीर करणारच आहोत.

तर जनहो, आता ऐका स्वातंत्र्य सत्तरी महिमा… स्वातंत्र्य मिळालं. देश स्वतंत्र झाला. ब्रिटीश गेले आणि आपले आले! सुरुवातीचा काही काळ बरा गेला. स्वातंत्र्याची मोकळी हवा होती. तत्व व निष्ठा जोपासणारे राजकारणी होते. ध्येयाने पछाडलेली तरुणाई होती. ही पिढी लयास गेली. त्यानंतर सुरु झाला तो सत्यानाश, अध:पतन आणि स्वैराचार. ज्या पांढ-या कपड्याबद्दल आदर वाटायचा, त्यांची कृष्णकृत्ये बघितली, तर ओकारी येते. अवघा देश लुटायला निघालेत. बरं यांची पोटही इतकी मोठी, की भुकच भागत नाही! त्या बकासुरासारखी. एक एक घोटाळा लाख लाख कोटीचा ! तरी आम्ही फक्त बघत बसतो. चालू द्या म्हणतो. कोणाच्याही चांगल्या कामात, त्यातल्या त्यात पुढार्यांच्या पुण्यकर्मात अडथळा आणायचा नाही, हे आमचं केवढं पुण्याचं काम!

शेतकरी कर्जापायी आत्महत्या करतोय, घाम गाळून पिकवलेल्या मालाला योग्य दाम द्या, असा टाहो फोडतोय. तिकडे आदिवासी भागात कुपोषणाने बालकांचे बळी जातात. त्या लेकरांच्या आया धाय मोकलून रडतात. बेरोजगारी दारिद्र वाढतंय म्हणून जनता बोंबलतीय बोंबलू द्या! सव्वाशे कोटी जनतेच्या देशात कोणकोणाचा आवाज ऐकणार? त्यापेक्षा ऐकू येत असताना बहिरं होणं केव्हाही चांगलं! कुपोषणाने बळी जात आहेत. दारिद्रयानं ग्रासलंय. सगळं खोटं आहे हो. वीस रुपयात दाळरोटी मिळतेय, असं अन्न सुरक्षा आयोग सांगतात! जगणं इतकं स्वस्त असताना माणसं मरत असतील, तर त्यात मायबाप शासनाचा काय दोष सांगा बरं? तर हे असं स्वस्तातलं जगणं आम्ही विनासायास जगतोय. शेतक-यांच्या आत्महत्या, कुपोषणाचे व दारिद्रयाचे बळी गुमानपणे बघतोय. हे आमचं केवढं अपार कतृत्व !

दरदिनी सामुहिक बलात्कार होतात. समाजात आणि संसदेत याचे पडसाद उमटतात. उभ्या देशात संतापाची लाट उसळते. या गुन्हेगारांना जन्मठेप द्या, फाशी शिक्षा द्या, अशी मागणी होते. दूरदर्शनच्या वाहिन्यावरुन अनेकजण मुलाखती देवून ‘समाजसेवा’ पार पाडतात! यापलीकडे जावून आम्ही काय करु शकतो? आमच्या आया-बहिणींची भररस्त्यावर अब्रु लुटणं, आता काय नवीन राहिलंय? चालायचंच. कायदा अन् कानूनची भिती बाळगलीच पाहिजे, असं कोणी सांगीतलय? स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत आपण. मनमानेल तसे वागायचं हा आपला अधिकारच आहे.आपण असे तर राजकारणी व राजकीय पक्षही आपल्या वरचढ ! गुन्हेगारांना पाठीशी घालणं, वेळप्रसंगी त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडून आणणं, त्यांना निवडणुकीत उतरवून पद आणि प्रतिष्ठा मिळवून देणं यासाठीच तर आपले राजकीय पक्ष आहेत. अशा गुंड, गुन्हेगारांना मतदान करुन त्यांची प्राणप्रतिष्ठा करणं यासाठीआम्हीही दाम घेवून मतदानाचा हक्क बजावतो! असा हक्क बजावणं हे आमचं किती महान व बहू‘मुल्य’ कार्य !

जनहो, आता मला सांगा, आमच्या कतृत्वाला काही सिमा? थोडन् थिडकं तब्बल ञ्याहत्तर वर्षे आम्ही आमच्या कतृत्वाची पताका या देशात फडकवतोय! त्याची नोंद स्वातंत्र्यानंतरचा इतिहास घेणार की नाही? आमच्या या थोर कतृत्वापासून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा लाभावी, यासाठी आमचं स्मारक व्हावं, यात चुक काय? आम्ही गेल्यावर तुमचा काय भरवसा? तेव्हा आमच्या हयातीतच आम्ही आमच्या स्मारकाच्या निमित्तानं, देशातील समस्त ‘जनता जनार्दनां’चं प्रतिकात्मक स्मारक व्हावं, अशी मागणी करतो. आता राहाता राहिला प्रश्न जागेचा! त्यासाठी राज्यकर्त्यांनी कोणाही बिल्डरला, ठेकेदाराला, नगरसेवकाला हुकूम करावा, सामाजिक प्रयोजनासाठी टाकलेलं आरक्षण उठवून आमच्यासाठी यातला कोणीही थोर महात्मा गुंठाभर जागा सहज देईल! तेव्हा काय पण करा. आमचं स्मारक आमच्या डोळ्यादेखतच उभारा. याचि डोळा याचि देहा, बघून स्मारक तृप्त होवू द्या आम्हा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here