Karjat : स्वाभिमानीचे मंगळवारी दूध बंद आंदोलन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कर्जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मंगळवार दि २१ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला. याबाबतचे निवेदन  तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी कर्जत तहसिलदारांना दिले आहे.

महाराष्ट्रातील दूध उत्पादक हा प्रामुख्याने भूमिहीन शेतमजूर आहे. लॉकडाऊनमुळे आधीच यांचा रोजगार गेला असून अशा परिस्थितीमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमीतकमी १० रुपये कमी दराने शेतकऱ्यांना आपले दूध विकावे लागत आहे. तरी केंद्र आणि राज्य सरकार यांना जाग येत नाही. म्हणून दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या एक दिवसाचे लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनामध्ये केंद्र शासनाने २३ जून रोजीचा दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावे, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रुपये देण्यात यावे. दूध पावडर, तूप, बटर व इतर दूग्धजन्य पदार्थवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा. पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
जर आपल्या या रास्त मागण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारने ३० जुलैपर्यंत न केल्यास १ ऑगस्टपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यवापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या आशयाचे निवेदन निवासी नायब तहसिलदार सुरेश वाघचौरे यांना दिले आहे. यावेळी रावसाहेब धांडे, चेअरमन राहुल धांडे, अनिल सावंत, नामदेव धांडे, सागर देमुंडे, सरपंच तात्यासाहेब खेडकर आदी उपस्थित होते.
मंगळवार दि २१ जुलै रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गावातील आपल्या ग्रामदैवतास दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालावा. दुधाचे संकलन कोणी न करता सोशल डिस्टन्सचे नियम पाळत शांततेत कुठे ही कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा न आणता आंदोलन करावे. त्या दिवशी दुधाची नासाडी न करता ते दूध गोरगरीब जनतेस मोफत वाटावे, असे आवाहन तालुक्यातील दूध उत्पादकास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here