मुख्यमंत्री पुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ’मातोश्री’वर कोरोनाने धडक दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या दोघा सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.
तेजस ठाकरे यांना ’वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तेजस ठाकरे यांच्यासह तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता दोघेही ’कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले आहेत.
तेजस ठाकरेंच्या इतर सुरक्षारक्षकांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली आहे. इतर सुरक्षारक्षकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
काय करतात तेजस ठाकरे?
वडील उद्धव ठाकरे आणि मोठे बंधू-मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे.
तेजस ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वीच पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे.
तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींचे जनुकीय वेगळेपण आणि प्राणी शरीरशास्त्राच्या नियमानुसार सविस्तर संशोधन करण्यात आलं. या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ’मँग्निफिसंट डवार्फ गेको’ असं ठेवण्यात आलं आहे.
सप्टेंबर महिन्यात तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ’कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ’बोईगा ठाकरे’  असं ठेवण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here