जालना – जिल्ह्यातील बदनापूर येथील एका 45 वर्षीय शेतकर्याला कारमधून नेऊन तीन ते चार तास मारहाण करून जखमी अवस्थेत हमरस्त्यावर सोडून दिल्याची घटना घडल्यामुळे बदनापुरात खळबळ उडाली आहे. बदनापूर येथील पवार गल्लीत राहणारे सदाशिव पवार (45) या शेतकर्यावर हा प्रसंग ओढवला.
पवार हे परवा 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आपल्या शेतीतील दैनंदिन काम आटोपन घरी आले असताना त्यांना फोन करून मी तुमच्या सासुरवाडी कडील व्यक्ती आहे, मी बदनापूर येथे बैल खरेदी करण्यासाठी आलेलो आहे, तुमच्या ओळखीने मला बैल घेऊन द्या असे म्हणून पवार यांना जालना- संभाजीनगर हमरस्त्यावर नगर पंचायत कार्यालयासमोर बोलावले. तिथे लाल रंगाच्या कारमध्ये तीन इसम होते. त्यांनी पवार यांना या दाजी बसा कारमध्ये असे म्हणून कारमध्ये बसवले. पवार यांना आपले पाहुण्या गावाचे लोक असतील असे वाटल्याने ते कारमध्ये मागील सीटवर बसले. कारमध्ये बसताच त्यांनी कार सुरू केली व पवार यांचाच शर्ट काढून त्याने नाक, तोंड व डोळे बांधून टाकले. सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या तिघांनी या शेतकर्याला प्रचंड मारहाण केली तसेच मोबाईलवर फोन येत असल्याने फोन बंद करून हिसकावून घेतला.
या मारहाणीत पवार यांचे दोन दात पडले तसेच पाय मुरगळून डोळ्याच्या वरच्या भागास इजा करून जखमी केले. रात्री दहा वाजता सेलगाव जवळील उड्डाणपूलाजवळ पवार यांना जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोर पळून गेले. जखमी पवार यांनी उपचार घेतल्यानंतर बदनापूर पोलीस ठाण्यात येऊन या बाबत फिर्याद दिली असून तीन हल्लेखोरांनी कारमध्ये पळवून नेऊन दात पडून जखमी केले असून तिन्ही आरोपीचे वर्णन पोलीसाना दिले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बदनापूर येथील मुख्य रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणाहून शेतकर्याला वाहनातुन नेऊन मारहाण करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
