Ahmednagar BreakingNews : कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णाशेजारी!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्हा रुग्णालयातील प्रकार; व्हिडिओ काढणा-यावरच गुन्हा

नगर: कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह दुसऱ्या एका कोरोना बाधित रुग्णाशेजारीच ठेवल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घडला. याप्रकाराचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी एका व्यक्तीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एखादा मृतदेह आयसीयूमधून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेसाठी किमान अर्धा तास आवश्यक असतो. त्यापूर्वीच हा व्हिडिओ काढल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी केला आहे.

नगर जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा काही वेळ संबंधित कक्षातच ठेवण्यात आला. याबाबतची माहिती तेथे उपचार घेत असलेल्या एका बाधित महिलेने तिच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर संबंधित महिलेचा एक नातेवाइक हा तेथे तेव्हा त्याला आतमध्ये प्रवेश करण्यास तेथील परिचारिकेने विरोध केला व आतमध्ये येण्यास मनाई असल्याचे सांगितले; मात्र त्यानंतरही संबंधित व्यक्तीने कक्षामध्ये प्रवेश केला व त्या कक्षात उपचार घेत असलेली संबंधित व्यक्तीची नातेवाइक असणारी बाधित महिला व तिच्यापासून थोड्या अंतरावर असलेला मृतदेह यांचे व्हिडिओ शूटींग केले. त्यानंतर, ‘तुम्ही सरकारकडून फुकट पगार घेत आहात का, तुम्ही आमच्या नातेवाइकाच्या जवळ ठेवलेला मृतदेह अजून का शिफ्ट केला नाही, मी काँग्रेसचा अध्यक्ष असून हा प्रकार वरपर्यंत नेईन,’ असे म्हणत आरडाओरडा करून संबंधित व्यक्ती हॉस्पिटलमधून निघून गेली.

या प्रकाराची माहिती हॉस्पिटल प्रशासनाला मिळताच, संबंधित व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय हॉस्पिटलच्या प्रशासनाने घेतला. त्यानुसार संबंधित व्यक्तीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. अजिता प्रकाश गरूड यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, डॉ. मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा प्लास्टिकमध्ये ठेवणे, त्याचे सॅनिटायझेशन करणे, अशा प्रक्रियेला किमान अर्धा तास तरी लागतो. त्यापूर्वीच संबंधित व्यक्तीने व्हिडिओ काढला आहे,’ असा दावा केला.

माजी नगरसेवकावर गुन्हा

कोरोना बाधित रुग्णाची भेट घेतल्याप्रकरणी पाथर्डी येथील माजी नगरसेवक चांद मनियार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधइत रुग्ण असल्याची माहिती असतानाही तेथे जात, निष्काळजीपणा करून इतरांच्या व स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी मनियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here