!!भास्करायण !! शेतक-यांचे कांदे अन् ‘अकलेचे कांदे’ !

3

भास्कर खंडागळे, बेलापूर, (9890845551)

देशातल्या शेतक-यानं आपल्या राज्यकर्त्यांचं काय घोड मारलंय तेच कळत नाही. उठसूठ शेतक-यांच्या मुळावर. अन्नधान्न्याच्याबाबतीत देशाला स्वावलंबी बनविलं. त्याच्या तपश्चर्येला अशी फळं मिळतील असं वाटलं नव्हतं. एकीकडं भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणायचे आम्ही ‘भूमिपुत्र’ असून शेतकर्यांचे वाली आहोत असे म्हणत मिरवायचे. दुसरीकडे त्याचं शेतकर्यांची फसवणूक करुन शेतकर्यांची थट्टा करायची. भले रे भले!

शेतक-यांची अशा तर्हेने पदोपदी थट्टा करणारांना या महाभागांचा आता ‘हिसका’ दाखवायची वेळ आली आहे. ए.सी.मध्ये बसून गप्पा मारीत बसणा-या कामचुकारांना सहावा वेतन आयोग. उन्हातान्हात, थंडी-वार्यात, पावसापाण्याची फिकीर न करता शेतामध्ये राबणार्या कोट्यावधीच्या पोशिंद्याची मात्र उपेक्षा. त्यापेक्षा भारत कृषिप्रधान’ देश आहे. ही बिरुदावलीही पुसून टाका. त्याऐवजी हा देश देशाला लूटून स्विस बँकेत घबाड ठेवणार्यांचा, कोट्यावधींचे घोटाळे करुन तिहारमध्ये हवा खाणारांचा, सत्तेच्या माध्यमातून आपलं ‘चांगभल’ करुन घेणार्या तथाकथित सहकार सम्राट, दूधसम्राट, शिक्षणसम्राट, महर्षि आणि जनतेच्या पैशावर जनतेचे काम न करता चंगळ करणार्या ‘लालफिती’चा आहे, हे घोषित करुन टाका. होवून द्या एकदा तुमच्या मनासारखं. शेतकर्याचा जीव घेतल्याशिवाय तुमचाही आत्मा थंड होणार नाही.

तुम्हाला लुटायला काय फक्त शेतकरीच सापडतात? काळ्या धंद्यावाले, दोन नंबरवाले, करबुडवे यांच्याविरुद्ध कां शेपटं घालता रे. कुणीही यावं अन् टपली मारुन जावं, अशी गत करुन ठेवलीय तुम्ही. शेतकर्यांची म्हणे बळीराजा ! हा भामटेपणा सोडून, एकदा तरी शेतकर्याला न्याय देवून पुण्य पदरात घ्या. शेतकरी काय हरामाचं मागत नाही. कष्टाचं फळ मागतो. फुकट्यांना मतासाठी जनतेची तिजोरी खाली करणार्यांनो, ह्या तिजोरीतून शेतकर्यानाच कसे काही मिळत नाही. एकदा आपल्या मनाला विचारुन बघा. आपण खरंच ‘भूमीपूत्र’ शेतक-यांच्या औलादी म्हणण्याच्या लायकीचे राहिलेत कां हे तपासा. टाळक्यात मेंदू आहेत की कांदे-बटाटे? असं म्हणणं देखील शेतक-याशी इमान राखणा-या कांद्या-बटाट्यांचा अपमान आहे. इतके तुम्ही नालायक झालात. शेतक-याच्या जिवावर मोठं व्हायचं. त्यालाच पायी तुडवायचं. शाब्बास रे भूमिपुत्रांनो !

शेतीमालाचे भाव वाढले की, चॅनेलवाले धावलेच म्हणून समजा! मग गृहिणींच्या मुलाखती. त्यावर शहरातील सुखवस्तू महिला म्हणणार ‘क्या कहूँ, उस महेंगाईने जनताको गैराण कर दिया है. सब्जीयोंके, अनाजके बढते भावसे तो जिना मुश्किल हो गया है !’अग बाई आणि चॅनेलवाले भाई, हेच प्रश्न लिपस्टीक, फेअर अॅिण्ड लवली, स्नो पावडर, मोबाईल हँडसेट, साड्यांचे भाव वाढल्यावर कां विचारत नाही. दोन दोन हॅण्डसेट, डोळ्यावर रेबन किंवा फॅस्ट्रॅकचा गॉगल घालणारी ‘गरीब मड्डम’ तेंव्हा कां बोंबलत नाही.

वृत्तपत्र ह्या लिखित माध्यमांचा अपवाद सोडला तर दृश्य माध्यमे शेतकर्यांविरुद्ध आहेत. कारण वृत्तपत्रांमध्ये अजूनही ग्रामीण भागाविषयी आस्था आहे. तळमळ आहे. पण दृश्य माध्यमांचं काय? तुम्ही कोणाचं प्रतिनिधीत्व करता. मुठभर शहरी जनतेचं की खस्ता खाणार्या सत्तर टक्के ग्रामीण जनतेचं. तुमच्या चॅनेलवर जसे फॅशन शो, रिअॅ लिटी शो, कॉमेडी सर्कस, बिग ब्रदर ‘चंगळवादी’ कार्यक्रम रात्रंदिवस चालू द्या. जास्त नाही किमान दिवसभरातला अर्धा तास तरी उपेक्षितांसाठी ठेवाल की नाही. फक्त शेतकर्यांच्या आत्महत्याची ब्रेकिंग न्यूज दाखवली की संपलं तुमचं उत्तरदायित्व? आम्हाला ठाऊक आहे. शेतकर्यांचे प्रश्न मांडून चॅनेलचा ‘टी.आर.पी.’ वाढणार नाही. पण भाऊंनो, शेतक-यांच्या आत्महत्यांचा ‘टी.आर.पी.’ वाढतोय. याचा तुम्ही अन् तुमचे चंगळवादी शहरी संस्कृतीवाले विचार करणार कां नाही? परदेशी कंपन्यांच्या तिजोर्या भरणारांचा शेतक-यांना देतानाच कां जीव जातो?. आमच्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी शेतक-याला वा-यावर सोडलंच आहे; पण किमान तुम्ही तरी शेतकर्याच्या मागं उभं रहा. देव तुमचं कल्याण करील रे भाऊंनो !

शेतक-यांनी पिकवायचं अन् त्याचा भाव मंत्री समिती, कृषि मुल्य आयोगाने ठरवायचा. हा कोणता न्याय झाला? ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकिर’ अशी ही तर्हा. कृषि मुल्य आयोगाला उत्पादन खर्चाबद्दल माहिती कोण देणारा, प्रत्यक्ष उत्पादन करणारा शेतकरी नाही. तर ‘महाथोर’ कृषि विद्यापीठे! शेतकर्यांसाठी असणार्या कृषि विद्यापिठाच्या कुरणावर जोगणर्यांना आमचा सवाल आहे, कोणता निकष लावता रे शेतकर्यालाच उत्पादनाला? असे निकष तुमचे वेतन ठरविताना लावले तर चालतील कां, कृषि विद्यापिठे बसून एकरी उत्पादन खर्चाबाबत थट्टा करणार असतील, तर ही कृषि विद्यापिठं खाली करा अन् तेथे वेड्यांची इस्पितळ उभी करा.

राहाता राहिलो आपण! शेतकरी ! आपण तरी काय करतोय? लुटारुंच्याच हातात तिजोरीच्या चाव्या देतो. आपण तरी कुठंय त्यांच्या राजकीय, मानसिक गुलामगिरीतून बाहेर येतोय. राजकारण म्हणजे आपलं सर्वस्व राजकारणी, सहकार सम्राट म्हणजे आपली दैवतं. आपणच आता दगडांना शेंदूर लावायचं थांबवलं पाहिजे. एकदा हा शेंदूर बाजूला होवू द्या, मग ह्या दगडांना कळेल शेतकरी काय अन् त्याची ताकद काय आहे ते.

कृषि मुल्य आयोग, त्यांना सल्ला देणारी कृषि विद्यापिठे आणि त्यांचा निर्णय शिरसावंद्य मानून ‘अकलेचे तारे’ तोडणार्या मायबाप राजकारण्यांचा एकदा तरी ‘येळकोट’ होणे गरजेचे आहे. किती दिवस निवेदने, मोर्चे, कांद्याचे हार घालून विनवणी कराल यापुढे ‘भिक नको, हवे घामाचे दाम’ अशी पोकळ घोषणाबाजी पुरे ! आता म.फुलेंनी सांगितलेला आसूड बाहेर काढा अन् एकच कार्यक्रम राबवा. “वाजवा रे वाजवा !’’

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here