Sangamner : वाळू वाहतूक करणाऱ्या पिक-अप ने घेतला युवकाचा बळी…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपने रस्ता क्रॉस करणाऱ्या ॲक्टिवा स्कूटरला जोराची धडक दिल्याने हा दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव अरफाद अल्ताफ शेख वय 20 रा. नायकवाड पुरा संगमनेर असे असून याप्रकरणी अल्ताफ शेख यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून त्यावरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास आपल्या ॲक्टिवा स्कूटर नंबर एम.एच.17 बी के 6807 वरुन नाशिक पुणे हायवे वरील जोर्वे नाका येथे रस्ता क्रॉस करत असताना पुणे नाक्याकडून संगमनेरकडे येणाऱ्या पिक-अप मालट्रक नंबर एम.एच.15 ए.जी. 2440 ने जोराची धडक दिली. या अपघातात अरफाद हा युवक गंभीर रित्या जखमी झाला, अपघात करून हा पिक अप पुढे निघून गेला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक व रात्री गस्तीवर असलेले संगमनेर शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी या गंभीर जखमी युवकाला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान या युवकाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरची पिक-अप पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.

संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवरून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहने अतिशय वेगात आपल्या गाड्यां चालवत असतात मागील महिन्यात तालुक्यातील देवगड येथे अशीच एक बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी गाडी निळवंडे धरणाच्या कॅनॉलसाठी खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाली होती व त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा या युवकाचा या वाळू वाहतूक करणाऱ्यांनी बळी घेतला आहे. त्यामुळे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही, असे पुन्हा एकदा दिसून आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here