Breaking News : यू टेक शुगर वर जप्ती आणून शेतकऱ्यांना व्याजासह थकीत एफआरपी देण्याचे आदेश..!

आप्पासाहेब ढूस यांच्या प्रयत्नाला यश…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उसाच्या एफआरपी थकबाकी प्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील यू टेक शुगर ली. वर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीचे आदेश दिले आहेत.

देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी यू टेक शुगरकडे थकीत असलेले जवळपास पाच हजार शेतकऱ्यांचे 31 हजार 685 मेट्रिक टन गाळप झालेल्या उसाचे थकीत पेमेंट रक्कम 04 कोटी 61 लाख 57 हजार रुपये अदा करणे कामी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री महोदयांनी ढूस यांच्या पत्राची दखल घेऊन तात्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी कारखान्याचे साखर गोदामात आग लागली होती. त्या संशयास्पद आगीची सुद्धा चौकशीची मागणी ढूस यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती. चौकशी अंती कारखाना प्रशासन दोषी आढळल्याने यू टेक शुगर वर जप्ती आणून शेतकऱ्यांना व्याजासह थकीत एफआरपी देण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.

कारखान्याने ऊस दर नियंत्रण कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचा अहवाल आहे. आयुक्त गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे की उसाची थकीत रक्कम रक्कम 04 कोटी 61 लाख 57 हजार रुपये या रक्कमेची 15 टक्के दराने देय होणारे व्याज यू टेक शुगरकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मळी, आणि बग्यास इत्यादी उत्पादनाची विक्री करून त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याचे स्वतःच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. त्याबद्दल कारवाईसाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना त्यांचे थकीत ऊस पेमेंट रक्कम 04 कोटी 61 लाख 57 हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने आप्पासाहेब ढूस यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here