Corona death: वेळेत तपासणी आणि उपचार मिळाले असते तर आईचे प्राण वाचले असते….

उपचारापूर्वीच कोरोनाबधित महिलेचा मृत्यू;

श्रीरामपुरात एकाच दिवशी दोन मृत्यू

श्रीरामपूर: दुपारी शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असताना आज सायंकाळी पुन्हा एका महिलेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे या महिलेला कुटुंबीयांनी यापूर्वी दोन वेळा डॉ. आंबेडकर वसतिगृह येथे तपासणीला नेले होते मात्र त्यावेळी आरोग्य प्रशासनाने तिची तपासणी नाकारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वेळेत उपचार मिळाले असते तर आमच्या आईचे प्राण वाचले असते मात्र निदान उशिराने झाल्याने रुग्णालयात पोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली, अशी खंत मृत महिलेच्या मुलांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या थैमानात प्रभाग क्र.१६ मधील बेलापूर रोड वेशीजवळ राहत असलेल्या ७३ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना कोरोना टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही दवाखान्यात दाखल करून घेतले जात नव्हते. दुसरीकडे तिची चाचणी करण्यासही टाळाटाळ केली जात होती. याबाबत माहिती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांना संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितली. खोरे यांनी तात्काळ डॉ. वसंत जमदाडे यांना संपर्क करत कोरोना तपासणी करण्याची मागणी केल्याने संबंधित महिलेची तपासणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने सेन्टलूक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सदर महिलेला नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. नगरसेविका स्नेहल खोरे यांनी स्वतः लक्ष घालत सदर परिसर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला आहे. खोरे यांनी या परिसरातील नागरिकांच्या टेस्ट करण्याची विनंती तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ.मोहन शिंदे व डॉ.वसंत जमदाडे यांचेकडे केली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले. अधिकारी सांगत असलेल्या आकडेवारीतही तफावत आहे. तालुका आरोग्य अधिकारी फोन घेत नसल्याची खुद्द तहसीलदार प्रशांत पाटील यांचीच तक्रार आहे. कॅन्टोन्मेंट झोनमध्ये करावयाच्या रॅपिड टेस्ट इतर भागात का केल्या? काही लक्षणे नसलेले रुग्णालयात आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी टाळण्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही प्रशासन संबंधितांवर कारवाई का करत नाही? तपासणी किट वेळोवेळी का हलवण्यात आले? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

आरोग्य अधिकारी, कर्मचार्यांवरही अन्याय कोरोना

रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरवर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करताना भेदभाव केला जातो. पन्नासपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणाचा धोका असलेल्या ठिकाणी नियुक्ती देऊ नये, असे संकेत असताना ते पाळले जात नाहीत. काहींना वेळोवेळी व जास्तवेळ कोरोना सेंटरवर नेमले जाते. याउलट मर्जीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोकळीक मिळते, अशी माहिती एका आरोग्य कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या बोलीवर दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here