!!भास्करायण !! जिच्या हाती पाळण्याची दोरी…

भास्कर खंडागळे, बेलापूर, (9890845551)

आपल्या देशात महापुरुषांच्या, कर्तृत्वसंपन्न महिलांच्या जयंती, पुण्यतिती येतात, साज-या होतात. पुढं काय? पुढं सगळं सपाट! याला कारण? पहिलं अर्थात राजकारण! दुसरं म्हणजे कोणालाच कोणाचं घेणे-देणं उरलेलं नाही. समाजासाठी कोणी काय त्याग केला, कोणी खस्ता खाल्या याचा विचार करायला कोणालाच वेळ नाही. सगळे पैशाच्या आणि कमाईच्या उचापतीत इतके व्यस्त आहेत की, पुछो मत!

ताजं उदाहरण घ्या. सावित्रीबाई फुलेंचं. या थोर महिलेनं मुलींना शिक्षण मिळावं, तिच्या जीवनात ज्ञानज्योतीचा प्रकाश पडावा म्हणून खस्ता खाल्या. प्रसंगी समाज-कंटकांच्या दगडांचा मार खाल्ला. आजच्या नटून-थटून शाळा-कॉलेजात जाणा-य आमच्या लेकी-बाळींपैकी किती जणींना सावित्रीबाई आठवते? त्यांचा त्याग आठवतो? बिचा-या लेकी-बाळी तरी काय करणार हो? त्यांनी व्हॅलेंटाईन डे, ट्रॅडिशन डे, रिलेशनशिप डे, फ्रेंडशिप डे, पहावेत की इतिहासातील महिलांच्या जयंती अन् पुण्यतिथी! काहीतरीच! किती बॅकवर्ड, किती बॅकवर्ड! आजकाल फॉरवर्डनेसला अन् मॉडपणाला महत्व आहे. या फॉरवर्ड जमान्यात रहायचं तर लेकी-बाळींना ब्युटी पॉर्लरमध्ये जा, फॅशन शो अॅटेंड करा, असे पुरोगामी विचार द्यायचे सोडून सावित्रीबाई, जिजाऊच्या गोष्टी करायला सांगायच्या म्हणजे आपण आजच्या फॉरवर्ड लेकी-बाळींच्यादृष्टीने एकदम बॅकवर्ड विचारांचे! चक्क मागासलेले!

त्याकाळी युद्ध अपरिहार्य होतं म्हणून लक्ष्मीबाई तलवार घेवून लढली असेल. म्हणून आता कां लेकी-बाळींनी लढाया करायच्या? हातात तलवारी घ्यायच्या? आजचा लेकी-बाळींचे हात आहेत ते ‘मेरे हाथोमं नौ – नौ चुडीयाँ’ म्हणायला किंवा टाईमपाससाठी रातभर हाथभर मेहंदी सजवायला! अशा व्यापातून थोर महिलांच्या आठवणीसाठी वेळ काढायचा. शी ऽऽऽ काहीतरीच!

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उद्धारी’ असा स्त्रीचा थोर महिमा सांगणारी आमची महान संस्कृती. या संस्कृतीचा पार इस्कोट व्हायला लागलाय. पूर्वीच्या महिला ‘रात्रंदिन आम्हा प्रपंचाचा ध्यास’ म्हणायच्या. आता ‘रात्रंदिन हाती टि.व्ही.चे बटन’ असं झालंय. ‘सास भी कभी बहू थी’ संपली की ‘चार दिवस सासूचे’ सुरु! या ‘गोजिरवाण्या घरात’ संपते ना संपते तोच’ ‘काटा रुते कोणाला’ चालू ! हे सिरियलवाले आमच्या मायलेकींनी अन् लेकी-बाळींना जरा बाजूला होवून पोरासोरांचं, घर-प्रपंचाच पहायची सवडच देत नाहीत हो. त्याला महिला काय करतील? जमाना बदलला तसं बदलावं लागतं म्हणून तर ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’ गेली अन् ‘जिच्या हाती टी.व्ही.चा रिमोट, तिच सांभाळी प्रपंचाची मोट!’ अशी नवी रित आलीय.

आता ही नवी रित आल्यानं सगळं कसं नवं नवं सुरु झालंय! पूर्वी सणा-वाराला सडा-रांगोळ्यानं अंगण फुलायचं. महिलाही आनंदानं खुलायच्या कपाळावर टपोरं कुंकू सजायचं आता भाळीचं कुंकू गेलं अन् टिकल्या आल्या. ‘जसा साडीचा रंग, टिकलीही हवी मॅचिंग!’ पूर्वी एकच रंग होता. लालधमक! आता कोण-कोणत्या रंगाच्या टिकल्या कपाळावर खुलतात ते कपाळच जाणे! आपल्याला तरी त्यातला काय कपाळ कळतं म्हणा! सणवार आला की घरात गोडधोड पदार्थ तयार करायला महिलांची धावपळ चालायची. हे करु की ते करु असं मन ओसंडून वहायचं. आता मनांचं ते ओसंडून वाहणं पुरतं आटलंय. आता काय. सण आलाय ना, मग बघता काय? जा हलवायाच्या दुकानात अन् आणा पोरांना मिठाया जावा लवकर. सिरियलची वेळ झालीय! काय करणार! पडत्या फळाची आज्ञा तसं पिशवी घेवून दादला निमूट वाजारात अन् बायका टि.व्ही.त रममान ! नवर्यात, पोरासोरात अन् प्रपंचात रमायला बाईला फुरसतच नाही!

नव-यानं ऑफिसात जायचं किंवा कामाधामाला जायचं. दिवसभर घरापासून दूर रहायचं. प्रपंचासाठी राबायचं. थकून-भागून घरी यावं. दारात कारभारीन हसत स्वागताला उभी असावी. तिनं घोटभर पाणी लाजत, मुरडत आणावं. आपणही घटाघटा प्यावं. कसलं काय रावं? कधीबी यावं तर कारभारीन टी.व्ही. म्होरंच. गुमान आपल्या हातानं पाणी घ्यावं आन् थोबाडावर शिपडावं नाहीतर ढसाढसा घशाखाली घालावं. काहीच मजाच राहिली नाही. आसं वाटतं. आपणच टी.व्ही.बनून जावं. म्हणजे त्यानिमित्ताने तरी कारभारणीला आपल्याकडं पाहायला सवड मिळलं. द्या टाळी!

हा गमतीचा भाग सोडून द्या. विनोद, थट्टा, मस्करी बाजूला ठेवा. खरं सांगा. किती बदललाय जमाना नाही? त्यातल्या त्यात ज्यांच्या हाती पाळण्याची अन् खर्या अर्थानं संसाराची दोरी आहे, ती दोरी काळाच्या ओघात किती कमकुवत झालीय नाही? ही दोरी कमकुवत झाली म्हणून तर पाळण्यात पहुडणारं नव्या पिढ्यांच भवितव्यही फुसकं बनू लागलंय. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ किंवा ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’ याचा अर्थच पुसला गेलाय. याचा परिणाम रोज वृत्तपत्रातून अन् टि.व्ही.च्या पडद्यावर झळकणार्या बातम्यातून दिसताहेत. विवाहितेला जाळून मारलं, पैशासाठी पत्नीचा खून, किरकोळ भांडणातून घटस्फोट, अबला महिलेवर सामुदायिक बलात्कार, हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, अमुक युवकाने तमूक युवतीला फुस लावून पळविले. ही सगळी अपत्य आजच्या ‘मॉड’ संस्कृतीच्या पाळण्यात पोसली जाताहेत. दुर्दैवाने ‘विकृतीचा भस्मासूर’ झोपलेल्या पाळण्याची दोरी आपण देहभान हरपून हलवित आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here