Rahuri : तालुक्यात मुसळधार पाऊस; देव नदीच्या पुलावरून पाणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी तालुक्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस सक्रिय झाला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाळ्यात प्रथमच देव नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सडे येथे देव नदीच्या पूलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे सडे-वांबोरी रस्ता आज शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद पडला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सडे पुलाचा काही भाग तुटला आहे.

गुरुवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. तालुक्यातील सर्व सातही महसूल मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली.

वांबोरी महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्यात एक हजार नालाबंडिंग व शंभर सिमेंट बंधारे उभारले. सर्व नालाबंडिंग व बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले. दीड टीएमसी पाणीसाठा झाला. बहुतांश गाव तलाव, वनखात्याचे पाणवठे भरले आहेत. ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे.

सडे येथे देव नदीवरील पूल यापूर्वीच दुरुस्त केलेला आहे. कालच्या पावसामुळे देव नदीला आलेल्या जोरदार प्रवाहाचा तडाखा बसल्याने दुरुस्तीचा पुलाचा भाग कोसळला आहे. पुलावरून पाणी चालू असल्याने सडे वरून वांबोरी कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला आहे.

महसूल मंडळ निहाय काल रात्रीच्या पावसाची महसूल खात्याची नोंद मिलिमीटर अशी : राहुरी (62.8), देवळाली प्रवरा (57), सात्रळ (41), ताहाराबाद (60), वांबोरी (119), ब्राह्मणी (41), टाकळीमिया (24). शुक्रवारी दुपारी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here