ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारीच प्रशासक? राष्ट्रवादी काँग्रेस व हजारे यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न

राळेगणसिद्धीः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यांशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चा केली. त्या वेळी विनायक देशमुख, आ. नीलेश लंके, राजेंद्र फाळके आदी.

भागा वरखडे / राष्ट्र सह्यद्री

नगरः मुदत संपलेल्या सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींवर कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर आणि हा निर्णयच वादग्रस्त झाल्यानंतर तो रद्द करून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरकारी अधिका-यांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तसा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा ग्रामविकास विभागाने काढलेला आदेश वादग्रस्त ठरला. हजारे यांनी या निर्णयावर थेट आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील काही सरपंचांनी थेट उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. हजारे यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता टीका केली असली, तरी त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. त्याचे कारण पुण्यातील एका पदाधिका-याने कार्यकर्त्यांना पत्र पाठवून थेट निधी दिला, तर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू, असे सांगितले होते. हजारे यांच्या पत्रातही तोच उल्लेख होता. हजारे यांनी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रानंतर मुश्रीफ यांनी लगेच हजारे यांना पत्र पाठवून भेटीची वेळही मागितली. त्यासाठी तीन वेळा त्यांनी हजारे यांचे भाचे विनायक देशमुख यांच्यांशी संपर्क साधला.

हजारे यांच्यावर कायम ते भाजपधार्जिणे असल्याची टीका होत होती. दोन्ही काँग्रेसचे सरकार आले, तर ते लगेच आंदोलन करतात आणि तुलनेने भाजपबाबत साैम्य धोरण स्वीकारतात, असे सर्वांचे मत होते. देशमुख यांनाही हजारे यांची अशी प्रतिमा तयार होणे मान्य नव्हते. चर्चेतून तोडगा काढला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे आज मुश्रीफ, देशमुख, आ. नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींनी हजारे यांची भेट घेतली. ४० मिनिटे चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्तीला हजारे यांचा ठाम विरोध असल्याने त्यावर पर्याय काय, यासंबंधाने चर्चा झाली. ग्रामसेवकांना प्रशासक नेमण्यात येणा-या अडचणींचा उहापोह झाला. विस्तार अधिका-यांची मर्यादित संख्या आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हजारे यांनी मंडलाधिका-यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. हे अधिकारी महसूल विभागाशी संबंधित आहेत. त्यामुळे आता पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन हजारे यांना देण्यात आले. कार्यकर्त्यांऐवजी सरकारी अधिका-यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यावर एकमत झाले.

ग्रामविकासात हजारे यांचे मार्गदर्शन घेणार

आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास खात्याची जबाबदारी आर. आर. पाटील यांच्याकडे होती. हजारे आणि आर. आर. यांचे संबंध अतिशय चांगले होते. मुश्रीफ यांनी या संबंधांचा उल्लेख करून आपणाला मार्गदर्शन करण्याचे साकडे हजारे यांना घातले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर हजारे आणि मुश्रीफ यांच्यात बैठक होणार आहे. त्यानंतर ग्रामविकास विभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न  करण्यात येणार आहे.

शरद पवार-हजारे यांच्यातला दुरावा कमी करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हजारे यांनी वारंवार टीका केली आहे. पवार यांनी हजारे यांच्या टीकेला साैम्य भाषेत प्रत्युत्तरही दिले आहे. पवार यांच्या निकटवर्तीयांवर हजारे यांचा आक्षेप आहे. यापूर्वी पवार यांच्याबाबत केलेल्या एका विधानानंतर राष्ट्रवादीने राळेगणसिद्धीत आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर पवार आणि हजारे यांची भेट घडवून त्यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते. त्यांतील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here