Crime : येरवाडा जेलमधून पळालेल्या आरोपीच्या श्रीगोंदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

खून, दरोडा, जबरी चोरी, असे गंभीर गुन्हे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

येरवडा कारागृहातून पळालेल्या आरोपीचा पाठलाग करीत, अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आज पहाटे चोर पोलिसांचा चित्तथरारक लपंडाव राक्षसवाडी शिवारात रंगला. श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने आरोपी देवगण अजिनाथ चव्हाण (रा. बोरावकेनगर) याला पकडून पुन्हा बेड्या ठोकल्या. 

खून,दरोडा,जबरी चोरी,मोक्का,अश्या विविध 9 गंभीर गुन्ह्यांची दौंड व यवत पोलीस स्टेशनला नोंद असलेला खतरनाक आरोपी चव्हाण हा (दि 16) पहाटे येरवडा कारागृहातून पळाला होता. त्याच्यासोबत अजून चार आरोपींनी देखील कारागृहातून पलायन केले होते. यातील आरोपी देवगण चव्हाण याने आपली ओळख लपवण्यासाठी केस, दाढी काढून टाकली होती.

हा आरोपी हा राक्षसवाडी शिवारात असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज दि25 पहाटे पोलिस वेशांतर करून राक्षसवाडी शिवारातील लोहकरा नदीच्या पुलाखाली लपून बसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेले. मात्र, पोलीस आल्याचा सुगावा लागल्यामुळे हा आरोपी पळू लागला. परंतु पोलिसांनी चार ते पाच किमी पाठलाग करून चित्तथरारक पद्धतीने या आरोपीच्या मुसक्या आवळल्याच.

ही कारवाई श्रीगोंदा सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो हे कॉ अंकुश ढवळे, पो कॉ प्रकाश मांडगे व पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांनी केली. आरोपीला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here