Editorial : अनावश्यक मुद्यांचे राजकारण

11

राष्ट्र सह्याद्री 25 जुलै

राजकारण विकासाचे करायचे असते. मूलभूत प्रश्नांवर राजकारण्यांनी भांडायचे असते; परंतु सत्ताधारी असो, की विरोधक; दोन्हीही विकासाचे राजकारण करीत नाहीत. भावनिक मुद्द्यांचेच राजकारण करतात. विकासकामांची स्पर्धा व्हायला हवी. तशी ती होत नाही. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे म्हणणारे शिवसेना आणि राष्ट्रवादीही भाजपला त्याच पद्धतीने उत्तर देताना आपल्या ब्रीदवाक्याला विसरले आहेत. भाजप तर सुरुवातीपासून भावनिक मुद्यांवर भर देत आला आहे. विकास आणि मूलभूत प्रश्नांवर विरोधकांनी कितीही आवाज उठविला, तरी ते गाैण कसे ठरतील आणि भावनिक मुद्दयांभोवती राजकारण, चर्चा कशी खिळून राहील, यावर सातत्याने भाजपचा भर राहिला आहे.

लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांचे काम, कर्तव्य ही ठरवून दिलेले असते; परंतु त्याचा विसर पडला आहे. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात राम मंदिर प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका आणि उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेताना दिलेल्या घोषणांवरून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुरू केलेली टीका-टीप्पणी, आरोप हे विकासाचा मुद्दा दुर्लक्षित करून नसलेल्या मुद्यांवर जनतचे लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. टीकेला उत्तर देता येते; परंतु तो मुद्दा पुढे किती काळ ताणायचा, हे ही महत्त्वाचे असते. कोणाला कशाचे दुःख होईल आणि त्यातून कोणाच्या जखमेवरच्या खपल्या काढल्या जातील, हे सांगता येत नाही.

पवार यांनी सोलापूरच्या दाै-यात सध्या देशापुढे कोरोनाचे आव्हान आहे. राम मंदिर महत्त्वाचे आहेच. त्याच्या बांधकामाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोरोना संक्रमणाच्या अगोदर झाली असती, तर कोणाची हरकत असण्याचे काहीच कारण नव्हते. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर भूमिपूजन केले असते, तरी त्यातून काही बिघडले नसते. गेल्या सत्तर वर्षांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडविला. बाबरी मशीद पतनानंतरही २८ वर्षे गेलीच आहेत. त्यामुळे आणखी काही महिने गेले असते, तर फार फरक पडला नसता; परंतु बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराला मुद्दा मिळावा, म्हणून भारतीय जनता पक्षाने राम मंदिर बांधणीचा मुहूर्त कोरोनाचा संसर्ग धोकादायक पातळीवर झाला असताना काढला आहे. शंकराचार्यांसह अनेकांनी पाच आॅगस्टला मुहूर्त नाही, असे म्हटले आहे. असे असताना पवार यांनी राम मंदिर बांधल्यानंतर कोरोनावर मात करता येईल का, असा प्रश्न विचारला असेल, तर त्यात गैर काही नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्याला उत्तर दिले. खरेतर तेवढ्यावर प्रकरण तिथे संपायला हवे होते; परंतु तसे झाले नाही.

पवार संसदीय राजकारणात गेल्या साठ वर्षांपासून आहेत. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहाचे सदस्य राहिलेले ते एकमेव सदस्य आहेत. पवार यांचा निषेध करण्याचा भाजप परिरावाला अधिकार आहे; परंतु नेमके ते शपथ घेत असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देणे, हा केवळ आैचित्यभंगच नाही, तर उपसभापती व्यंकया नायडू यांचाही अवमान आहे. शपथ घेणा-याबरोबरच शपथ देणा-याचाही तो अवमान असतो, हे लक्षात घ्यायला हवे. परंतु तेवढे तारतम्य भाजयुमोला नाही. त्यानंतर पवार यांना ‘जय श्रीराम ‘ लिहिलेली दहा लाख पत्रे पाठविण्याचे निषेध आंदोलन भाजयुमोने हाती घेतले. भाजपचे खरे दुःख पवार यांनी सोलापुरात जाऊन विजयसिंह मोहिते पाटील विरोधकांची बांधलेली मोट आणि मोदी यांच्यावर केलेली टीका हे आहे. पवार यांनी मोदी यांच्यावर यापूर्वीही टीका केली, तर मोदी यांनीही पवार यांच्यावर थेट गंभीर आरोप केले. खरेतर या दोन्ही नेत्यांच्या टीका-टीप्पणीवर इतरांनी भाष्य करण्याची आवश्कयता नाही. ते दोघेही समर्थ आहेत; परंतु उथळ पाण्यालाच खळखळाट जास्त असतो. असो. दुसरा मुद्दाही असाच.

संसद किंवा विधिमंडळात शपथ घेताना राज्य घटनेने घालून दिलेला मसुदाच वाचायचा असतो. त्यात आपल्या पदरचे काही घालायचे नसते. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शपथ घेत असताना राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या मसुद्यात स्वतःची भर घातली होती. अन्य मंत्र्यांनीही तेच केले. संसदेत ही असेच प्रकार घडले आहेत. त्या त्या वेळी अशा घटनांना तिथेच रोखले असते, तर वारंवार असे प्रकार घडले नसते. आताही उदयनराजे यांनी खासदारकीची शपथ घेताना जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. राज्यसभेच्या अध्यक्षांच्या दालनात हा शपथविधी झाला. उदयनराजेंच्या या शपथविधीतील जादा भागाला काँग्रेसच्या खासदाराने आक्षेप घेतला. त्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तेवढा भाग वगळून उदयनराजे यांना समज दिली. हा विषयही तिथेच संपायला हवा होता. येथे कोठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालेला नाही; परंतु संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने या विषयावर राजकारण सुरू केले. आंदोलन केले. उपराष्ट्रपतिपदाला घटनेने महत्त्व दिले आहे. त्या पदावर कोण आहे, हा मुद्दाच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नायडू यांचे पुतळे जाळले, हे चुकीचे आहे. उपराष्ट्रपती राजकारणातीत पद आहे, याचे भान राष्ट्रवादी काँग्रेसने सोडले.

शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर नायडू यांनी समज देण्यावरून सध्या वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आणि सभागृहात नेमके काय झाले याची माहिती दिली. उदयनराजे शपथ घेत असताना तिथे पवारही होते. त्यांनी त्यावर काहीच भाष्य केले नाही. उदयनराजे यांना बसण्यासाठी दिलेल्या जागेवरूनही वाद उकरून काढण्यात आला. महाराष्ट्राच्या छत्रपतींचा अवमान झाला, की नाही, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला. नंतर मात्र नायडू जे वागले, ते बरोबरच आहे, असे राऊत एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना मग त्याविरोधात टीका का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

महाराजांचा अपमान झालाच नाही, तर राजीनामा देण्याचा आणि आंदोलनाचा प्रश्नच नसल्याचे उदयनराजे म्हणाले, ते बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केले जाऊ नये, असे उदयनराजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राऊत हे म्हणत असताना तीन पक्ष मात्र त्याच मुद्यावरून राजकारण करीत आहेत. पवार यांचा निषेध करून भाजयुमोने पवार यांना दहा लाख पत्रे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसही तोच मार्ग अनुसरत आहे. एकाने वासरू मारले, म्हणून दुस-याने कालवड मारण्याचा प्रकार आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता, असे उदयनराजे यांनी सांगूनही कोणी ऐकायला तयार नाही. संभाजी भिडे गुरूजींना याच मुद्यावरून पेटविण्याचा उद्योग आता काही करीत आहेत.

राऊत आणि उदयनराजे यांच्यातील वितुष्ट सर्वांना माहीत आहे. मागेही या दोघांत चांगलाच वाद झाला होता. आता शिवसेना शिवसेना राहिली नाही, तर ती ठाकरे सेना झाली असून संजय राऊत हे महान व्यक्ती आहेत, असा टोला लावायला उदयनराजे विसरले नाहीत. आता या मुद्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. या सर्व पत्रांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली असणार आहे. पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून मोहीम राबवली जात असून ‘जय श्रीराम’ लिहिलेली दहा लाख पत्र पाठवली जाणार आहेत. भाजपच्या याच मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस नायडूंना २० लाख पत्र पाठवून उत्तर देणार आहे. हे जशास तसे उत्तर नसून दुसरा चुकीच्या मार्गावरून चालला, तर मीही त्याच मार्गावरून जाईल, असे आहे.

11 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here