शितलतरंग : अहंकार

0

भगवद्गीतेतील

” अहङ् कार बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम !
विमुच्य निमम: शान्तो ब्रम्ह्भुयाय कल्पते ।।

यानुसारअहंकार, बल , दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह ह्यांचा जो त्याग करतो आणि ममत्व भावनेने जी व्यक्ती शांत राहाते तिच ब्रम्हप्राप्तीस पाञ बनते.

अहंकार माणसाचा मोठा शत्रू आहे. हे आपल्याला पुर्वानुकाळापासून सांगण्यात आलेले आहे. हे माहित असुनही व्यक्ती अहंकारव्याप्त असतात. जसे की कर्तृत्वाचा, रुपाचा, संपत्तीचा, ज्ञानाचा, पदाचा, सत्तेचा काहींना अहंकार असतो. त्या व्यक्तिजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे सर्व काही हेच त्याला माहित असते. पुरातन काळापासून आपण बघत आलेलो आहोत की, महान पुरुषांनी अहंकाराचे हरण कशा रितीने केले.

जेव्हा ७०० वर्षे तपश्चर्या करून योगविद्येचा अभ्यास केलेले चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या भेटीला हातात साप आणि वाघावर बसुन आले, तेंव्हा त्यांच्या अहंम् चे हरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज साक्षात निर्जिव भिंतीवर बसुन चांगदेवांच्या भेटीला आले.

ब्रम्ह्नज्ञानी रावण अहंकारामुळे दानव बनला. त्यामुळेच त्याचा शेवट प्रारभूरामांच्या हाताने झाला. नामदेवांना भक्तीच्या अहंकारातून मुक्ताईने मार्मिक पणे दूर केले. अहंकाराची जाणिव ब-याचदा व्यक्तीला होत नसते पण इतरांना ती जाणवत असते. याची जाणिव त्या व्यक्तीला होते तेव्हा, एकटेपणाचे पिशाच्च त्याच्या पाठीशी लागते.

संसारात नवरा बायको यांच्यात होणा-या वादात जर दोघांनीही ईगो ठेवला, तर दोघांतील वाद विकोपाला जाऊन संसारातील गोडवा लोप पावू शकतो. गोडव्याची जागा कटुता आणि अखेर ताटातुटीत होते.

अहंकारी व्यक्ती अतिआत्मविश्वासी बनते.अंध बनते.मला जगात काहीही शक्य आहे असे ती मानू लागते. आत्मप्रौढी म्हणजेच सबकुछ मी , बाकी सर्व तुच्छ ! उद्धट व अरेरावी असणारी माणसे इतरजनांना आपले नोकर असल्याप्रमाणे अरेरावीच्या, अहंकाराच्या व तुच्छतेच्या भाषेत सतत बोलत असतात. याचा विचार केला तर, त्या व्यक्तीला गर्वातून बाहेर निघण्यासाठी त्याने दुस-यांना समजून घेणे किंवा त्याच्याकडुनही शिकण्याची तयारी ठेवणे, नेहमी समाधानी वृत्ती ठेवणे, दुस-यांना माफ करायला शिकणे , भौतिक सुखांच्या पलिकडे पहायला शिकावे.

आपल्या सुखी आनंदी समाधानी आयुष्यासाठी तसंच भौतिक प्रगती आणि अंतरीक प्रगतीसाठी अहंकाराचा त्याग महत्वाचा आहे. “Relationship never dies a natural death. It is murdered by ego,Attitude & Ignorance”असे म्हटले जाते.म्हणजे ” नात्यांचा मृत्यू होत नाही, तर खून होतो.”ते खरेही आहे.

त्यामुळेच मी कोणीच नाही ही भावना जोपासता आली पाहिजे. सगळा कर्ता करविता तोच आहे ही भावना मनात नेहमीच कोरली गेली पाहिजे.” अहंकाराचा काटा न लागो मनाला ” असे समजवायचे की मग जगणं नक्कीच उज्ज्वल होणार.

शेवटी अन्वयार्थ इतकाच की,’कधीही दुस-यास कमी लेखू नका. कारण एक ते नऊ अंकांच्या तुलनेत शुन्याला किंमत नसते. पण तेच शुन्य जेव्हा प्रत्येक अंकांसोबत जाऊन बसतो, तेव्हा प्रत्येक अंकांची किंमत वाढलेली असते. तेव्हा अहंकार त्यागा,विनयाने जगा!
शीतल चित्ते मलठणकर(पुणे) (९८५०८८८४०४)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here