Newasa : नऊ वर्षीय बालकासह 35 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित

परिसरात 100 दिवसांनी कोरोनाबाधित व्यक्ती

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – शहरात तब्बल शंभर दिवसानंतर ३५ वर्षीय व्यक्ती तर नेवासा तालुक्यातील जळके येथील नऊ वर्षीय बालक कोरोना बाधित असल्याचा अहवाल शनिवारी जिल्हा रुग्णालयातून आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तालुक्याचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या नेवासा शहरात पुन्हा ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.नेवासा शहरात रोज गर्दी वाढत आहे मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे.

नेवासा शहरात शंभर दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सलग पंधरा दिवस कडक बंदोबस्तात हॉटस्पॉट लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोरील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात कोविड सेंटर म्हणून सुरू करण्यात आले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सूर्यवंशी हे कोरोना बाधित रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांना उपचार व विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच नेवासाफाटा येथील श्वास हॉस्पिटलचे मुख्य हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश काळे व नेवासा येथील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रणव जोशी हे देखील रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. शासकीय पातळीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागवार नियुक्ती करण्यात आली आहे.

नेवासा शहरात तब्बल शंभर दिवसांनी कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जस जसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तसतसा गर्दीचा ही विस्तार होत गेला. नगरपंचायतने मास्क न घालणा-यांना केलेली दंडात्मक कारवाई ही तात्पुरती मलमपट्टी सारखी ठरली त्यामुळे अजूनही पुढे मोठा धोका जानकरांकडून व्यक्त केला जात आहे. नेवासा शहरात लोक गर्दी करतात. त्यामध्ये 50 टक्के लोकांना मास्क नसतो. उघड्यावर पिचकारी मारून थुंकणे हे प्रकार ही सर्रास पहावयास मिळत आहे.

दर रविवारी बाजार बंद ठेवला जातो. मात्र, सोमवार ते शनिवार या सहा दिवसामध्ये भाजी मंडई गर्दीने फुलून गेलेली दिसते. हे वास्तववादी चित्र असून यामध्ये प्रशासनासह नगरपंचायतने गांभीर्याने न घेतल्यास नेवासा शहर हे वादळापूर्वी शांतता असलेले ठरू नये, अशी भीती ही व्यक्त केली जात आहे. नेवासा तालुक्याचे नेवासा शहर हे केंद्रबिंदू असल्याने प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कडक भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहे.

नेवासा येथील पस्तीस वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज शनिवारी सकाळी प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती स्व:त नेवासा येथे कोविड सेंटरमध्ये हजर झाला. त्यानंतर शहरात ज्या भागात हा कोरोना बाधित व्यक्ती राहतो. त्याच्या घरी तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पहाणी करून संपर्कात कोण कोण आले. याची घरच्यांकडून विचारपूस केली. येथील काही भाग सील करण्यात येणार असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here