Shrirampur : माळवाडगांव परिसरात भाजीपाल्याला बसली महागाईची फोडणी

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

माळवाडगांव परिसरात बाजार बंद असल्याने व बाहेरील गावच्या विक्रेत्यांना गावात भाजीपाला विक्रीसाठी बंदी असल्यामुळे स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर चौपट केला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकर्‍यांना न होता रस्त्यावर बसून व किरकोळ विक्रीचे दुकान मांडलेले विक्रेते मधल्यामध्ये आपले उखळ पांढरे करून घेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर माळवाडगांव येथे बाहेरील गावच्या शेतकरी व व्यापाऱ्यांना गावात बंदी असल्यामुळे याचा फायदा सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी उचलला आहे. २५ रुपये किलो असणारा बटाटा ४० ते ५० रुपये किलोने विकत आहेत. २० ते २५ रुपये किलो असणारी मिरची ४० रुपये किलो,२५ ते ३० रुपये किलोची भेंडी ६० रुपये किलो, २० ते २५ रुपये किलोची वांगी ४० ते ५० रुपये, २० ते २५ रुपये किलोचा टोमॅटो ६० रुपये, 5 ते 10 रुपये असणारी पालकाची जुडी १५ ते २० रुपये, ५ रुपये असणारी कोथिंबीर जुडी १० रुपये, ५ ते १० रुपयांना असणारा कोबी गट्टा २० रुपये, २० ते २५ रुपये असणारा लसूण ५० ते ६० रुपये, ५ रुपयांना असणारे दुधीभोपळे १० रुपये,  १० ते २० रुपये किलो असणारे दोडके ४० ते ५० रुपये, १० ते १२ रुपये किलो असणारी काकडी २० ते ३० रुपये, १० ते १५ रुपयांना असणारी मेथी जुडी २५ ते ३० रुपये,२५ ते ३० रुपये किलो असणारी गवार ४० रुपये किलो, याप्रमाणे सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

ग्राहकांना पाऊस असल्याने भाजीपाला विक्रीस कमी येत असल्याचे कारण देऊन चढ्याभावाने सर्रास नागरिकांची लूट सुरू आहे. मात्र, आजही बाजार समितीमध्ये जाऊन प्रत्यक्ष बघितले तर शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडत नाही. शेतकर्‍यांकडून १० ते १५ रुपये दराने खरेदी केलेली मेथी जुडी २५ ते ३० रुपये दराने विकली जात आहे. ३० रुपये किलो असणार्‍या शेवग्याच्या शेंगा ६० रुपये किलो, ३० ते ३५ रुपये किलो असणाऱ्या भूईमुगाच्या शेंगा ६० ते ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत. याप्रकारे मधल्यामध्ये हे दलाल पैसे कमवित आहेत.

परंतु शासन यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता कागदी घोडे नाचवित आहेत. जादा दराने विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा फक्त फतवा काढण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, आजवर याबाबत एकही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या लोकांचे फावले जात असून त्यांचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. परंतु मोलमजूरी करून खाणारे, ज्यांचे हातावर पोट आहे, असे व सर्वसामान्य नागरिक यांच्या खिशाला यामुळे कात्री लावली जात आहे.

आधीच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहे. पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असताना अशा प्रकारे होणारी नागरिकांची लूटमार म्हणजेच दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावे लागेल. ही सर्व लूटमार थांबविण्याचे काम शासनाचे आहे. परंतु या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला त्यांना वेळ कुठं आहे. बिचारी जनता महागाईच्या आगीत होरपळतेच आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here