Shrigonda : हिरडगाव येथील भुजबळ वस्तीवर 14 तोळे सोन्यासह तब्बल अडीच लाखांची रोख रकम लंपास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – हिरडगाव येथील भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ८२ हजार १६७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये २ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम आणि १३ तोळे ६६० ग्रॅम सोन्याचा समावेश आहे.

ही घटना काल मध्यरात्रीनंतर आज पहाटे अडीच वाजण्याच्या आत घडली.  कटावणीने दरवाजा उघडून, कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख २ लाख ३० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

भास्कर भुजबळ यांची मुलगी अश्विनी हिरडगाव येथील ईश्वर चिमाजी दरेकर यांना दिलेली आहे. ती आपल्या माहेरी आलेली होती. काल पंचमीच्या सणाच्या निमित्ताने आपले सर्व दागिने गळ्यात घालून ती हिरडगाव येथील नागनाथाच्या दर्शनासाठी गेली होती. नागनाथ मंदिराच्या परिसरातच कोणीतरी तिच्या दागिन्यांवर पाळत ठेवून, ही चोरी केली असल्याचे दिसते.

चोरी केल्यानंतर चोरांनी भुजबळ वस्तीवरील एका वीटभट्टी जवळ दागिन्याची पर्स उचकून पाहिली. या पर्समध्ये काही बेन्टेक्सच्या बांगड्या पण होत्या. दोन तोळ्याचा सोन्याचा हार देखील होता. बेन्टेक्सच्या बांगड्या आणि हार नकली समजून चोरट्यांनी पर्स जवळ टाकून दिला. अहमदनगर आणलेल्या स्वामी पथकाने चोराच्या मार्ग दाखवून दिला.

श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, हेडकॉन्स्टेबल आर.के. दहिफळे हे पुढील तपास करीत आहेत. ही चोरी पाळत राखून झाल्याची चर्चा हिरडगावमध्ये ऐकावयास मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here