भास्करायण | शेतीतल्या तरुणाईने महात्मा फुले जाणून घ्यावेत 

भास्कर खंडागळे 

आपल्या देशात शेतीच्या अर्थशास्त्राच्या आधाराने अभ्यास सर्वप्रथम कोणी केला असेल, तर म.फुले यांचाच निखालसपणे उल्लेख करावा लागेल. दोनशे वर्षापुर्वी म.फुले यांनी शेतीचे अर्थशास्त्र, शेतकर्‍यांच्या समस्या, शेतकर्‍यांचे आर्थिक परिवर्तन यासंदर्भात याचे केलेले विवेचन आजच्या उच्चशिक्षित अर्थशास्त्रज्ञांनाही अचंबित करायला लावील असे आहे. म.फुले यांनी त्यांचा शेतकर्‍यांचा असूड आणि समग्र विचार यातून ग्रामीण भाग आणि शेतकर्‍यासंदर्भात केलेल्या लिखाणातून त्यांच्यातील द्रष्टा अर्थशास्त्रज्ञच समोर येतो.

विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना क्षुद्र खचले । इतके सारे एका अविद्येने केले॥ यातून म.फुले यांनी शिक्षण आणि अर्थशास्त्राचे महत्व अधोरेखित केले आहे. दोनशे वर्षापूर्वीच्या या विचारांत किती तथ्य आहे, हे आज कळेल. शेतकरी समाजाने शिक्षण नाकारले. शेतीला व्यवसाय न मानता केवळ उदरनिर्वाहाचे साधन मानले. याचा अचूक फायदा चतूर व्यापार व्यवस्थेने घेतला. ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पिठ खातं’ अशी शेतकर्‍यांची अवस्था बनली. त्यात शेतकर्‍यांचे नेमके प्रश्न शासन दरबारी मांडण्यात शेतकर्‍यांचे प्रतिनिधी अपयशी ठरले. या सर्वांमधून शेतकर्‍यांच्या शोषणाची व्यवस्था उभी राहिली. आजचे तथाकथित सम्राट, महर्षि, कार्यभूषण अशा भूमिपुत्रांना व राज्यकर्त्यांना जे शहापण अजूनही सूचत नाही, ते शहाणपण ज्योतिबांनी दोनशे वर्षापूर्वी ब्रिटीशांना शिकविले! यातच ज्योतिबांना ‘महात्मा’ कां म्हणतात, याचे उत्तर गवसते.

म.फुले यांनी ब्रिटीश शासनाशी शेती आणि ग्रामविकासाबाबत केलेला पत्रव्यवहार, हा तर शेतकर्‍यांच्या चळवळीसाठीचा खजिनाच आहे. त्यांच्या पत्रव्यवहारातून त्यांनी ब्रिटीश शासनाने त्यांचेकडील जोमदार बियाणे इकडे आणून त्यांचा गावराण वाणांशी संकर करावा. परदेशी अधिक दूग्धोत्पादन देणार्‍या गायांच्या सिद्ध वळूंचे विर्य आणून त्याचा भारतीय गायींशी संकर करावा इतकी दूरगामी वैज्ञानिक सूचना दोनशेवर्षापूर्वी करणे, हे येरा गाबाळ्याचे काम नाही! ज्या गोष्टींचे महत्व ब्रिटीशकाळात म.फुले यांना उमगले, त्याची अंमलबजावणी आपण स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीच्या निमित्ताने केली! हे ध्यानात घेतल्यास म.फुले यांच्या दूरदृष्टीची व्याप्ती आणि कक्षा ध्यानात येईल. एक भारतीय शेतकर्‍यांचा नेता ब्रिटिशांसारख्या प्रगत लोकांना काय करावे हे सुचवित होता. हे ध्यानात घेतलं तर फुलेंच्या व्यक्तिमत्वाची उंचीची कल्पना येईल.

हे सगळे बघितल्यास, म.फुले यांना सलामच केला पाहिजे. आज शेतकर्‍यांची मुले शिकलीत. सुशिक्षितंची पिढी शेतीत आली. हा सुशिक्षित घटक चळवळीतही येताना दिसतोय. तथापि; आजही तो चाचपडतोय. शिक्षण असूनही तो दिशाहीन आहे. संघटित होवूनही अपेक्षित आहे. याचे प्रमुख कारण जे चिंतन, मनन, विवेचन व अभ्यास म.फुले यांनी त्याकाळी केला. त्यावर लिखाण केले. ते किती जणांनी वाचले, अभ्यासले, हा प्रश्न विचारावासा वाटतो. तसे असते, तर शेतकर्‍यांची उपेक्षा झालीच नसती. आज शेतकर्‍यांची शिकलेली पोरं आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांनी ज्योतिरावांना जाणून घेतले पाहिजे. जादूच्या कांडी फिरविल्याप्रमाणे एकाएकी परिवर्तन घडत नसते. परिवर्तनासाठी मानसिकता बदलावी लागते. लोकांच्या मनाची व मेंदूची मशागत करावी लागते. मशागतीनंतर वैचारिक परितर्वनाचे बियाणे रुजवावे लागते. त्यानंतर परिवर्तन घडते. त्याचप्रमाणे क्षणिक असंतोषाने व प्रतिके यांनी राज्यकर्त्यांना जाग येत नसते. त्यांना वठणीवर आणण्यासाठी म.फुले सारखा विचारांचा ‘असूड’ शासन व्यवस्थेवर उगारावा लागतो. यासाठी शेतीतल्या तरुणाईने महात्मा फुलेंचे विचार जाणून घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here