सुशांत आत्महत्या प्रकरणी आता आदित्य ठाकरेंवर कंगना राणावतने साधला निशाणा

3

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर हिंदी सिनेसृष्टीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. यात सर्वात आघाडीवर अभिनेत्री कंगना राणावत आहे. तिने तर थेट बॉलिवूडमधील बड्या हस्तींची नावे घेत आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सुरु असलेल्या वादात तिने आता थेट राज्याचे पर्यावरण मंत्री व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना ओढले आहे. आदित्य ठाकरे यांचा करण जोहर मित्र असल्यामुळे त्याची अद्याप चौकशी झाली नसल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे.
आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन कंगनाने जोरदार आरोप केले आहेत. बेधकडकपणे मुंबई पोलीस पक्षपात करत आहेत. चौकशीसाठी मला बोलावण्यात आले. पण अद्याप करण जोहरची चौकशी झालेली नाही. त्याऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवले. असे का? कारण साहेबांना त्रास होऊ नये म्हणून का? अशा आशयाचे ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला.
त्यानंतर तिने आणखी एक ट्विट करत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांचा करण जोहर हा खास मित्र असल्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. त्याऐवजी त्याच्या मॅनेजरची चौकशी झाली. सुशांतच्या हत्येची थट्टा करणे थांबवा, अशा आशयाचे ट्विट तिने केले.
सध्या मुंबई पोलिसांवर सुशांतच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे. ही केस पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशीही विनंती सध्या जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाचे हे ट्विट सध्या चर्चेत आहेत. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here