800 किलोमीटरचा प्रवास करुन राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार मुस्लीम भाविक

नवी दिल्ली – लवकरच अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार असून, येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे भूमिपूजन केले जाणार आहे. अयोध्येत त्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. छत्तीसगडमधील एक मुस्लीम भाविक 800 किलोमीटरचा प्रवास करुन राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी हजर राहणार आहे. या भाविकाचे नाव मोहम्मद फैज खान असे असून तो छत्तीसगडमधील चांदखुरी गावचा रहिवासी आहे. भगवान श्रीराम यांची आई कौसल्या यांचे जन्मस्थान म्हणून चांदखुरी हे गाव प्रसिद्ध आहे.
आपली एखाद्या मंदिराला भेट देण्यासाठी इतका मोठा प्रवास करण्याची ही पहिली वेळ नसल्याचेही मोहम्मद फैज खानने सांगितले. आतापर्यंत देशातील विविध मंदिर आणि मठांमध्ये मी राहून आलो आहे, त्यासाठी मी अंदाजे 15 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. धर्मामुळे कोणतीही समस्या मला कधीही जाणवली नाही. आताचा प्रवास तर फक्त 800 किलोमीटरचा असल्याचे मोहम्मद खानने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. मोहम्मदने या सोहळ्यासाठी आपल्या गावातील मातीसोबत घेतली आहे, सध्या तो मध्य प्रदेशातील अनुपूरपर्यंत पोहचला आहे.
धर्माने आपण मुसलमान असलो तरीही आपले पूर्वज हिंदू असल्याचे मोहम्मद खानने सांगितले. प्रभु श्रीरामांचा मी मोठा भक्त आहे. मी जरी मशिदीत जात असलो तरीही माझे पूर्वज हे हिंदूच होते. देशात राम मंदिराच्या निर्माणावरुन अनेक राजकीय वादळे आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना झाली असून 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे.
संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत आणण्यात येणार आहे. तसेच, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी 128 फूट एवढी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची 161 फूट एवढी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती 6 फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडाने बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता 5 कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here