Editorial : मैत्रीत विश्वासघात

राष्ट्र सह्याद्री 29 जुलै

भारताने सुरुवातीपासून अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले होते, तरीही भारत हा रशियाचा जवळचा मित्र आहे. रशियाच्या जवळच्या पाच मित्र देशांमध्ये भारताचा समावेश असला, तरी त्यांच्यासाठी सर्वांत जवळचा देश चीन आहे, असे रशियातील एकमेव खासगी संस्थेने म्हटले होते. २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षण चाचणीचा अहवाल २०१८ मध्ये उघडकीस आला होता. रशिया एकेकाळी भारताचा सर्वांत जवळचा मित्र होता; मात्र गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिकेतील मैत्री दृढ झाल्यामुळे भारत आणि रशिया यांच्या संबंधात काहीसा दुरावा निर्माण झाला. मध्यंतरी पाकिस्तान आणि रशियात जवळीक निर्माण झाली होती. अमेरिकेचा शत्रू तो आपला मित्र असे रशियाचे आतापर्यंतचे धोरण होते. त्यामुळे रशियाची पाकिस्तानबरोबर जवळीक वाढत चालली होती, तरी अजूनही रशियाला पाकिस्तानविषयी तितका विश्वास वाटत नाही, असे या संस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले होते.

रशियाचे नागरिक बेलारूसला त्यांचा सर्वांत जवळचा मित्र मानतात. त्यानंतर चीन, कझाकिस्तान, सीरिया आणि भारताचा क्रमांक लागतो. रशियाच्या नागरिकांना चीनविषयी भारतापेक्षा अधिक आपुलकी आणि विश्वास वाटतो. भारताने प्रारंभापासूनच रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी केली आहे. १९८०-९० च्या दशकात भारत शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून होता; मात्र आता अमेरिका, फ्रान्स आणि इस्रायल या देशांकडून भारताने शस्त्र खरेदी वाढवली. रशिया आणि चीन या दोन देशांत डाव्यांची सत्ता असली, तरी दोन्हींत जमीन अस्मानाचा फरक आहे.

चीनमध्ये हुकूमशाही आहे, तर रशियात नावालाच लोकशाही आहे. असे असले, तरी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी दोघांनी आपली हयात अध्यक्षपदी वर्णी लावून घेतली आहे. दोन्ही देशांत हुकूमशाही आहे. दोन्ही देशांत विरोधकांचा अमानुषपणे काटा काढण्यात आला आहे. दोन्ही देशांतील सत्ताधा-यांत आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे दोघेही विस्तारवादी आहेत. पुतीन यांनी क्रिमिया घशात घातला. चीनने तिबेट, हाँगकाँग, नेपाळचा काही भाग घशात घातला आहे. रशिया आणि चीन हे दोन्ही देश जगाचे राजकारण करताना परस्परपूरक भूमिका घेत होते; परंतु आता चीनला जागतिक महासत्ता व्हायची घाई झाली असून त्याचा विस्तारवाद थेट रशियालाही जड जातो आहे.

रशियातील व्लादिवोस्तोक शहर चीनच्या मालकीचे असल्याचे ट्‌विट चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने केले. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीचे मत हे त्या सरकारचेच मत असते. चीनने फिलीपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया, भारत, अमेरिका, जपाननंतर आता रशियाशी नवा वाद निर्माण केला आहे. मागील काही दिवसांपासून चीन नवनवे वाद निर्माण करत असून, जगावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. १८६० पूर्वी म्हणजे १६० वर्षांअगोदर व्लादिवोस्तोक शहर चीन देशाचा भाग होता. त्यावेळी त्याचे नाव हेशेनवाई असून, रशियाने एकतर्फी कराराअंतर्गत हा भाग बळकावला होता, असा दावा चीन करतो आहे.

या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून रशिया-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. रशियाने चिनी गुप्तहेर संस्थेवर पाणबुडीसंबंधी कागदपत्रे चोरल्याचा आरोप लावला होता. या प्रकरणात आपल्याच देशातील एका अधिका-याला देशद्रोहाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते, हे विशेष. जागतिक राजकारणात रशिया हा अमेरिकेचा पारंपारिक विरोधक समजला जातो. आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्दांवर रशियाने नेहमीच अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे अन्य देशसुद्धा या दोन देशांच्या गटात विभागले गेले. अलीकडे अमेरिकेच्या विरोधकाच्या यादीमध्ये चीनचाही समावेश झाला आहे.

आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्यांवर अमेरिकेचा सामना करण्यासाठी रशिया आणि चीन हे देश एकत्रित दिसले आहेत. अमेरिकेविरोधात चीनला बळकट करण्यासाठी रशियाने त्यांना घातक शस्त्रास्त्रांचासुद्धा पुरवठा केला. समान विरोधक असल्यामुळे रशिया आणि चीन एकत्र आले; पण भविष्यात हे चित्र बदललेले दिसू शकते. रशियाने चीनला देण्यात येणाऱ्या एस-400 मिसाइल सिस्टिमच्या पुरवठ्याला स्थगिती दिली आहे. हा निर्णय भविष्यात चीन-रशिया संबंध बदलाचे संकेत ठरु शकतो. कारण मैत्रीच्या आडून चीनने रशिया बरोबरही विश्वासघात केला आहे. मागच्या काही वर्षांत चीन आणि रशियामध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू झाला. रशियाने आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची विक्रीसुद्धा चीनला केली; पण आता चीनने रशियामध्येच हेरगिरी केल्याचे उघडकीस आले आहे.

काही दिवसांपूर्वी रशियन यंत्रणेने व्हॅलरी मितको यांना पकडले. ते सेंट पीटर्सबर्ग आर्कटिक सोशल सायसेस अकादमीचे अध्यक्ष आहेत. रशियाशी संबंधित असलेली गोपनीय कागदपत्रे चिनी गुप्तचर यंत्रणेला दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घटनेनंतरच रशियाने एस-400 च्या पुरवठयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रशियाच्या या निर्णयामागे चीनची हेरगिरीसुद्धा एक कारण असू शकते. दक्षिण चीन समुद्रापासून ते पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणावाची स्थिती निर्माण करणाऱ्या चीनला रशियाने सर्वांत मोठा झटका दिला आहे. रशियाने एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चीनला रशियाकडून ही मिसाइल प्रणाली मिळणार होती. एस-400 चा जगातील सर्वांत घातक मिसाइल सिस्टीममध्ये समावेश होतो. फायटर विमानांपासून ते शत्रूचा मिसाइल हल्ला परतवून लावण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे. कुठल्याही देशासाठी एक प्रकारचे हे हवाई सुरक्षा कवच आहे. भारतानेही रशियाबरोबर एस-400 सिस्टीम खरेदी करण्याचा करार केला असून पुढच्या काही महिन्यांत भारताच्या ताफ्यात या घातक अस्त्राचा समावेश होईल. सोहू यूएवायर या चिनी वर्तमानपत्राने रशियाने चीनला एस-400 सिस्टीमचा पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दिले आहे. काही प्रमाणात हे चीनच्या हिताचे आहे, अशी सारवासारवही या वर्तमानपत्रातून करण्यात आली आहे. ‘शस्त्र मिळाल्यानंतर इनव्हॉईसवर स्वाक्षरी करण्याइतके बंदूक मिळवणे सोपे नाही,’ असे या वर्तमानपत्राने लिहिले आहे.

भारताला रशियाने एस-४०० क्षेपणास्त्रे देण्यास गेल्या पंधरवाड्यात मंजुरी दिली. अमेरिकेचा विरोध डावलून भारत रशियाकडून ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे चीनला मात्र क्षेपणास्त्रे द्यायला रशियाने नकार दिला. त्यामुळे चीनने रशियाला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यात आले, असा आरोप चीनने भारताचा नामोल्लेख टाळून केला.  आता या मिसाइल सिस्टीमचा पुरवठा केला तर, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे कोरोना विषाणू विरोधात जे काम सुरू आहे, त्यावर परिणाम होईल असे रशियाला वाटते. रशियाला चीनला संकटात टाकायचे नाही,” असे चीनने म्हटल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. २०१८ मध्ये चीनला रशियाकडून काही एस-400 क्षेपणास्त्रे मिळाली होती. सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील एस-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम भारताला पुरवणार आहे. यापूर्वी हे अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल २०२१ पर्यंत भारताला देण्यात येणार होते. आता ते तातडीने उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे रशियाने भारताला देऊ नयेत, यासाठी चीनने दबाव आणला होता.

२०२४ पर्यंत रशिया भारताला दरवर्षी एक एसS-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम देणार आहे. या वर्षाच्या अखेरीस जर भारताला ही अत्याधुनिक संरक्षण प्रणाली मिळाली, तर भारत पुढील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये एस-400 देखील सहभागी करू शकेल. शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होऊ शकेल. रशिया दौ-यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक बोरिसोव्ह यांनी भारताला लवकर शस्त्रास्त्र पुरवण्याचे आश्वासन दिले होते. भारत आणि रशिया यांच्यात विशेष सहकार्य आहे आणि भारताबरोबरचा करार जलद पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले होते.

कोरोनासारख्या संकटाच्या काळातही द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ आहेत. २०१८ मध्ये, भारत आणि रशियादरम्यान जगातील सर्वांत प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा एस-400 साठी पाच अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता. पाच एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी भारत रशियादरम्यान हा करार झाला. याव्यतिरिक्त भारत रशियाकडून ३१ फायटर जेटदेखील खरेदी करणार आहे. याव्यतिरिक्त टी ९० टँकचे महत्त्वपूर्ण भाग पुरवण्याबाबतही रशिया आणि भारतात चर्चा झाली आहे. भारत आणि रशियादरम्यान तलवार श्रेणीतील फ्रिगेट, हेलिकॉप्टरसाठीही करार करण्यात आला आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर रशियाने विश्वासघातकी मित्राला दूर ठेवून भारतासारख्या जुन्या मित्रावर अधिक विश्वास ठेवला आहे, असे दिसते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here