!!भास्करायण !! कथा सिरम इंडिया इन्स्टिट्यूटची…

+++भास्कर खंडागळे,बेलापूर +++ [९८९०८४५५५१ ]

सध्या जगभर कोरोना लसीची चर्चा सुरु आहे. यात भारताची सिरम इंडीया इंन्स्टिट्यूटचं नाव बहुचर्चित आहे.सायरस पुनावाला यांच्या मालकीच्या ह्या कंपनीची जन्मकथा मोठी रोमांचक आहे. मोबाईलवरची ही कथा मला आवडली म्हणून शेअर करित आहे. पुण्याला स्वारगेटकडून हडपसरच्या दिशेने जाताना कॅम्पच्या पुढं गेलं की डाव्या बाजूला रेसकोर्स दिसतो. इतकी प्रचंड जागा कोणाची असावी, याची महिती घेतली असता सायरस पूनावाला हे नाव पुढं आले.

पूनावाल्यांचा रेसकोर्स दिसतो, पण घोडे कधी दिसले नाहीत. सायरस पूनावाला हे पहिल्यापासून गर्भश्रीमंत घरातले. आजच्या इतके नसले तरी श्रीमंती होतीच. त्यांच्या वडिलांनी १९४६ च्या दरम्यान पूनावाला स्टड फार्मची स्थापना केली होती. रेससाठी लागणाऱ्या उत्तम घोड्यांची पैदास करणं हा त्यांचा बिझनेस. हा बिझनेस फूल फार्मात होता. थोडक्यात पैसे नव्हते, गरिबी होता, असा काही संबध नव्हता. सायरस पूनावाला यांच शिक्षण देखील प्रतिष्ठित अशा बिशप स्कूल मधून झालं. पुण्याच्या बी.एम.सी.सी मधून त्यांनी आपलं बी.काॕम पूर्ण केलं.

कॉलेज झालं आणि परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन या पद्धतीप्रमाणे ते देखील या व्यवसायात आले. तोपर्यंन्त पूनावाला स्टड फार्म हा भारतातला प्रतिष्ठित स्टड फार्म झाला होता. रेसच्या घोड्यामध्ये पूनावाला कुटूंबाच नाव घेतलं जातं होतं. १३ घोड्यांपासून सुरू झालेला व्यवसाय सायरस पुनावाला यांच्या हाती येईपर्यंत बराच मोठा झाला होता. आत्ता सायरस पूनावाला यांच्या हाती पुनावाला स्टड फार्मची सुत्रे आली होती. वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी रेसिंग कार या विषयात रस घेतला. त्यांच मत होत की भविष्यात घोड्यांच्या रेस संपून जातील तेव्हा वेगळं काहीतरी करायचं होतं. पण काय?

हाफकिन इन्टिट्यूमध्ये म्हाताऱ्या घोड्यावर कोणते प्रयोग केले जातात याची चौकशी केल्यावर, त्यांना समजलं की, माणसांसाठी वापरण्यात येणाऱ्या लसी बनवण्याच काम इथे चालतं. त्यासाठी घोड्याची आवश्यकता असते. घोड्यांच्या रक्तातील सिरम नावाच्या घटकापासून लस बनवता येते. त्याकाळी साथीच्या रोगाचे प्रमाण जास्त असल्याने लस ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हती. सायरस पुनावाला यांनी सर्व परिस्थिती अगदी जवळून समजून घेतली. त्यावेळी रेससाठी निकामी झालेले घोडे इंजेक्शन देऊन मारण्याची पध्दत होती. पण हाफकीन इंन्स्टीट्यूटच्या कामाने प्रभावित झाल्याने, पुनावाला यांनी रेससाठी निकामी झालेले घोडे मारुन टाकण्याऐवजी सामाजिक बांधिलकी म्हणून, हाफकीन इन्स्टिट्यूटला विनामोबदला संशोधनासाठी देणे सुरु केले. याची अनेकांना माहिती देखिल नाही. पुढे निर्णय झाला तो म्हणजे, आता आपणच घोड्यांच्या सिरमपासून स्वत: लसी बनवायच्या!

गरिबातल्या गरिब माणसाला परवडली पाहिजे अशी लस आपणाला बनवता येईल. पण त्यासाठी मेडिकल क्षेत्राची जाण असणं गरजेचं होतं. त्यांनी आपला भाऊ जाव्री पूनावाला यांना सोबत घेतले. सन १९६६ साली आपल्या भावाच्या सहकार्यातून” सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया” या कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनी स्थापन झाली पण सर्वात मोठ्ठ काम होतं ते त्या पद्धतीची हुशार लोकं नेमून लस तयार करणं. त्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूटमधून दहा डॉक्टरांना खास नेमण्यात आलं. त्यांच्याकडे काम होतं की, धनुर्वाताच्या लस तयार करणं. दोन वर्ष या टिमने प्रयत्नपूर्वक काम करून घोड्यांच्या सिरमपासून धनुर्वाताची लस तयार केली. त्यानंतरचा प्रश्न होता या लसीला सरकारची मान्यता मिळवणं. सरकारने मान्यता दिलीच पण स्वस्त किंमत आणि प्रभावी असल्याने सरकारी दवाखान्यात त्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट देखील या कंपनीला दिलं.

सन १९७४ साली या कंपनीने DPT हि त्रिगुणी लस तयार केली. १९८१ साली साप चावल्यानंतर प्रभावी ठरणाऱ्या लसीचं उत्पादन करण्यात आलं. १९८९ साली  Measles Vaccine M-Vac चं उत्पादन करुन SIL कंपनी भारतातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी ठरली. Diphtheria, Pertussis आणि tetanus अर्थात DPT या SIL कंपनीमार्फत लसीकरण झालेल्या मुलांच प्रमाण सांगायचं झालं तर आज जगातील ३ पैकी दोन मुलांना या कंपनीने उत्पादित केलेल्या लसीमार्फत लसीकरण झालेलं आहे. DPT, M-VAC,BCG, रुबेला यांसारख्या अनेक लसी सिरम इंडिया मार्फत उत्पादित करण्यात येवू लागल्या.आशिया खंडातील सर्वात मोठ्ठी तर जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यामधील पहिल्या तीनमध्ये असणारी कंपनी म्हणून SIL चा आज उल्लेख केला जातो,आता या कंपनीची सूञे अधर पुनावाला यांचेकडे आहेत.

आपल्याला ज्या स्वस्तात पण प्रभावी लसी टोचल्या आहेत, त्या पुनावाला यांच्याच सिरम इंडिया कंपनीने टोचलेल्या आहेत. हे खूप उशिरा आपल्याला समजतं. त्यांच्या याच कार्यामुळे भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देवून गौरव केला आहे. सध्या कोरोनाच्या लसीवर सिरम इंडिया कंपनी काम करित आहे. तिला यश मिळावे अशीच भारतीयांची अपेक्षा राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here