भास्करायण | शिक्षणव्यवस्था व समाजव्यवस्था

+++भास्कर खंडागळे, बेलापूर,+++ (९८९०८४५५५१ )

शिक्षक हा समाजरचना आणि संस्कृतीची जडणघडण प्रक्रियेतला महत्वाचा घटक असल्याचे हे जगमान्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तर, गुरुला तर ‘ब्रह्मा-विष्णू-महेश्वर’ असे दैवताचे स्थान आहे. गुरुचा ‘साक्षात परब्रह्म’ असा उल्लेख होतो. सांगायचे तात्पर्य इतकेच, की समाज आणि संस्कृती यात गुरुचे स्थान आपल्या समाजमनाने सर्वोच्च आणि महत्तम असल्याचे अधोरेखीत केलेले आहे.

समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नसतो. प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या योगदानातून निर्माण होणारी सामूहिक व्यवस्था म्हणजे समाज. समाजकारण, कला, साहित्य, संगीत, क्रिडा अशा विविध क्षेत्राच्या मिश्रणातून समाजव्यवस्था आणि संस्कृती निर्माण होते. ही अदृश्य अशी प्रक्रिया असते. या प्रक्रियेत शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यवथा यातील परस्पर संबंधाचा महत्वाचा वाटा असतो. बालपण ते तरुणपण यात पालक आणि शिक्षक यांचे माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असते. त्यानंतर समाजाचे सामुहिक संस्कार व्यक्तीवर होत असतात. अशा व्यक्तिगत आणि सामुहिक संस्कारातूनच संस्कृती अस्तित्वात येते. इतके सारे विवेचन करण्याचा उद्देश एवढ्याचसाठी की, वरील समाजरचनेतील महत्वाचा असलेल्या शिक्षण व्यवस्थेबाबत चिंतन होण्याची नितांत गरज आहे.

आपला समाज गुरु-शिष्य हे पवित्र नाते मानतो. आज या नात्याला तडे जाताना दिसत आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यातील दुरावा वेगाने वाढत आहे. या नात्यामधले पावित्र्य आणि विश्वासाची भावना हद्दपार होत आहे. समाज आणि संस्कृती निर्माणाच्यादृष्टीने हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. असे का व्हावे, याचे उत्तर शोधावेच लागणार आहे. याचे कारण माणसाच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी ही त्याच्या बाल्यावस्थेत आणि त्यानंतरच्या शिक्षण व्यवस्थेत होते. जसा पाया, तशी त्या पायावर इमारत उभी राहते.पायाच ढिसूळ असेल, तर त्यावर भक्कम इमारत उभी करणे केवळ अशक्य असते.

हेच सूत्र समाज व्यवस्थारुपी रचनेस तंतोतंत लागू ठरते. आपण नैतिकतेची भाषा वापरतो. सभ्यता आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा करतो. अशावेळी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, नैतिकता आणि सुसंस्कृतपणा तेंव्हाच येतो जेंव्हा समाज नैतिक आणि सभ्यतेच्या पायावर उभा असतो. नैतिक समाजाचा दबाव हा नितीमुल्ये जोपासण्यास माणसाला भाग पाडतो.
हे ध्यानात घेतले, तर एक वास्तव समोर येते. आपली समाजव्यवस्था आज भौतिकवादाच्या ढिसूळ पायावर उभी आहे. अशा समाजव्यवस्थेत टिकाऊ निर्मिती होत नसते. जे काही निर्माण होते ते टाकाऊ असते. आपण चंगळवादाची कास धरली आहे. भोगवाद ही संस्कृती बनली आहे. अशा भोगवादी समाज व्यवस्थेत नैतिकतेच्या भाषेला थारा नसतो. याउलट अशा समाजात नैतिकता हा टिंगलीचा विषय ठरतो. त्यात आपला समाज हा दुटप्पी मानसिकतेचा आहे.

शिक्षकही याच समाजव्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे जो भोगवाद समाजाने स्वीकारला, ज्या असभ्यपणाला सामाजिक अधिष्ठान लाभले त्याचा स्पर्श शिक्षण व्यवस्थेला आणि त्यातील घटकांना होणे अपरिहार्य आहे. अशातूनच मग आपल्याच विद्यार्थीनीशी वेगळेच नाते जडण्याचा प्रयत्न होतो. काही शिक्षक पवित्र नाते विसरुन राक्षसी प्रवृत्तीने वागण्यास प्रवृत्त होतो. नात्याचा विसर पडणे याचाच अर्थ बुद्धी आणि विवेक भ्रष्ट झाला, त्याचप्रमाणे संवेदनाही बोथट झाल्या आहेत, हेच विदारक सत्य आहे.

अशाही विदारक स्थितीत आशावाद जिवंत ठेवणारे शिक्षक आणि समाजसेवक समाजात आहेत. भविष्यातील समाजरचना आणि संस्कृती निर्मितीचे एवढेच आशास्थान आता उरले आहे. नवनिर्माणाचे आव्हान हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य पेलायचे, तर केवळ विशिष्ट एका घटकाकडून अपेक्षा धरणे चुकीचे आहे. हे मान्य असले, तरी शिक्षकच अशा नवनिर्माणाची पायाभरणी करु शकतात हे देखील तितकेच खरे आहे. याचे कारण पालकापेक्षाही मुले शिक्षकाचे अनुयायी असतात. त्याचा अचार, विचार याचे पडसाद त्याच्या मनात उमटत असतात. त्यामुळे जो समाज आपल्याला ‘गुरुदक्षिणा’ देतो, त्या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शिक्षकांनी पुढे आले पाहिजे.

नैतिक व सभ्य समाजरचनेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसे संस्कार आणि बाळकडू विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत. शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला जे तडे जात आहेत, ते बुजविले पाहिजेत. शिक्षकांनी मनापासून ठरविले, तर हे अवघड असले तरी अशक्य नाही. भारतरत्न अब्दुल कलाम, डॉ.राधाकृष्णन, साने गुरुजी आदि शिक्षकांनी हे दाखवून दिले आहे. तो मार्ग प्रत्येक शिक्षकाने स्वीकारला, तर नैतिक अधिष्ठान, सुसंस्कृतपणा तसेच सभ्यता असलेल्या शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचे पुनरुत्थान होईल.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here