अवाजवी बिल आकारलं

मिरा रोडमधील येथील हॉस्पिटलची कोव्हिड मान्यता रद्द

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

कोरोना रुग्णांकडून अनेक रुग्णालयं अवाजवी बील आकारत असल्याचं समोर आलं आहे. मिरा भाईंदर महापालिकेने अशा एका रुग्णालयाला दणका दिला आहे. मिरा रोड येथील गॅलेक्सी रुग्णालयाची कोविड रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने रद्द केली आहे.
गॅलेक्सी रुग्णालयाने अधिक बील आकारल्याच्या तक्रारी रुग्णांनी पालिकेकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मिरा भाईंदर महापालिकेने गॅलेक्सी रुग्णालयाची कोविड रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. कोरोना रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम रुग्णालयाकडून वसूल करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत.
खाजगी रुग्णालयांनी कोविड अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ८० टक्के बेड राखीव ठेवणे आणि शासनाने दिलेल्या दरानुसार कोव्हिड रुग्णांकडून बिल आकारणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णालये शासनाच्या आदेशाचे पालन न करता रुग्णांना अवाजवी बील आकारत आहेत. गॅलेक्सी रुग्णालयाविरुद्ध अशा तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून रुग्णालयास शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कामकाज न केल्याबाबत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मात्र गॅलेक्सी रुग्णालयाकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही. तसंच लेखापरीक्षणानंतर अधिक आकारणी केलेल्या रकमा रुग्णांना परत केल्याचे पुरावे सादर केले नाही. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली. त्याचप्रमाणे रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here