!!भास्करायण !! सरकार चालवा!सरकार घालवा!!

3
भास्कर खंडागळे ,बेलापूर (९८९०८४५५५१ )
राज्यात कोरोनाचा कहर असताना राजकीय रंगमंचावर “सरकार चालवा,सरकार घालवा”हे वगनाट्य जोरात व जोशात रंगले आहे. मुख्यमंञी,उपमुख्यमंञी, काँग्रेसचे अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षाचे देवेन्द्र फडणवीस हे मुख्य भुमिकेत आहेत.मातब्बर शरद पवार दिग्दर्शक, तर संजय राऊत हे वगनाट्याचे सूञधार आहेत.

त्याचं असं आहे की, शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेवून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी घरोबा केला. राज्यात युतीचं शासन येईल असे सर्वाना वाटत होते.त्यात फडणवीस तर मुख्यमंञ्याच्या अविर्भावात होते.त्यांनी राञी शपथ घेवून दिड दिवसाचे मुख्यमंञ्याचा तर अजितदादांनी उपमुख्यमंञी पदाचा विक्रम केला!पण पवारसाहेब नामक खाष्ट सासूने हनीमूनपूर्वीच हा संसार मोडला!देवेंन्द्रजींचे मी पुन्हा येईनचे स्वप्न साकारता साकारता भंगले!

दिड दिवसाचा दिड शहाणपणा सरला आणि शिवसेनेने मुहुर्ताचा भाजप सोडून काँग्रेस ,राष्ट्रवादीशी गंधर्व उरकला. यामुळे फडणवीस,चंद्रकांतदादा आणि भाजपचा तिळपापड झाला. तसे होणे स्वाभाविकच होते. तीस वर्षाचा संसार होऊन सत्तेची सन १९९५ व २०१४ मध्ये दोन लेकरं होवून घटस्फोट होणे. हे संतापजनकच!हे कृत्य शिवसेनेने केले असा भाजपचा आरोप. तर भाजपच नीट नांदवित नाही असं सेनेचं रडगाणं. राज्यात तीन पक्षाचे महाआघाडी सरकार स्थापन झाले आणि वगनाट्याला सुरुवात झाली.

सरकार स्थापन होताच हे तिन चाकी सरकार आहे असा सवती मत्सराचा टोला देवेन्द्र यांनी दिला. तर तिन चाके असले तरी रिक्षा सुरळीत चालेल. अपघात होणार नाही त्याची विरोधकांनी चिंता करु नये, असे प्रत्युत्तर मुख्यमंञी उध्दव ठाकरेंनी दिले.या प्रत्युत्तराच्या आगीत खा.संजय राऊत यांनी मुलाखतीचे तेल ओतले.झाले! राऊतांनी तेल ओतताच आगडोंब उसळला.

अशात मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना राज्यपालनियुक्त आमदारकीची खेळी वाकबगार व राजकीय नारद अशी भाजपकडून संभावना होणाऱ्या शरद पवार यांनी केली. यामुळे नाटकात अधिकच रंग भरला. आता सूञधार बनले राज्यपाल कोश्यारी. त्यांनी या प्रकरणाला वेगळीच कलाटणी देत आपली पडद्याआडची भूमिका दिल्लीतल्या दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार चोख बाजावली. पुढे ठाकरे विधानपरिषद सदस्य बनले. नाटकाचा एक अंक संपला.

दुसरा अंक सुरु झाला तो सरकार पडणार या अफवेने. हे सरकार टिकणार नाही असे चंद्रकांतदादा वदले. तर सरकार पाच वर्षे चालेल काळजी करायचं कारण नाही, असा आजितदादांनी दम भरला! फडणवीस माञ हे सरकार त्यांच्याच कृतीने पडेल यावर ठाम. तर मुख्यमंञ्यांनी सरकार पाडूनच दाखवा असे आव्हानच देऊन टाकले.

अशात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांच्या राजकीय गडाला जाग आली. तुम्ही तुमचंच बघता. आम्हाला विचारीतच नाही राव! असा राग आळवायला सुरुवात केली. यामुळे विरोधी गटात उकळ्या फुटू लागल्या. पण थोरात मातोश्रीवर जावून आले आणि आमच्यात ममतभेद नाहीत. अशोक चव्हाणही हम सब एक है असे बोलते झाले. फडणवीस व चंद्र्कांतदादांचे उकळलेले दूध पुन्हा निवले!

वगनाट्याचा शेवटचा अंक रंगला तो संजय राऊतांनी मुख्यमंञ्याच्या घेतलेल्या मुलाखतीने. यात राऊतांनी भाजप डिवचली जाईल असे प्रश्न विचारले. उत्तर देताना मुख्यमंञी म्हणाले “आमची तिन चाकी रिक्षा तर तिन चाकी! पण मग केन्द्र सरकारची गाडी किती चाकी? दुसरे म्हणजे हिंमत असेल तर ही मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडून दाखवा” असे आव्हानच विरोधकांना दिले.

हे आव्हान स्वीकारीत चंद्रकांतदादा म्हणाले “आमच्या केन्द्र सरकारची गाडी कितीही चाकी असो तुम्हाला काय त्याचे?आमच्या गाडीचा चालक खंबीर आणि चालाख आहे”. यावर फडणवीस गप्प बसतील तर ते फडणवीस कसले? “आम्ही कशाला सरकार पाडू? तुमचेच पाय तुम्ही खात असलेल्या केळीच्या सालीवारुन सटकेल! दुसरे, तिन चाकी रिक्षा कुठे न्यायची हे मागे बसणारा प्रवासी ठरवितो,”असा खवचट टोला लगावला.

राज्यात जनता कोरोनाने ञस्त व भयग्रस्त आहे. लोक तणावाखाली आहेत. अशा तणावातून जनतेला क्षणभर विरंगुळा या वगनाट्यातून मिळत आहे. कोरोनाचे काहीही होवो, आपण सरकार व विरोधकांचे “सरकार वाचवा, सरकार घालवा”हे बहुरंगी, बहुढंगी विनोदी वगनाट्य बघून आनंद घ्यावा. जनतेच्या हाती आणि नशिबी दुसरं काय असतं म्हणा….

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here