Human Interest Story : आईचं कष्ट अन् बहिणींच्या पाठबळावर ती बनली कर सहाय्यक अधिकारी

आईची कन्येसाठी केलेली साधना अखेर फळाला आली
प्रतिनिधी | राजेंद्र जैन | कडा | राष्ट्र सह्याद्री  
वंशाला दिवाच हवा म्हणून कन्यारत्नाला कायम दुय्यम स्थान देणा-या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून जेमतेम अक्षरांची ओळख असणा-या मातेने आपल्या पणतीलाच वंशाचा दिवा समजून प्रज्वलित करुन थेट कर सहायक अधिकारी करण्याचे स्वप्न साकारले आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील अतिशय दुर्बल घटक समाजातील गरीब कुटूंबातील साधना सैदू जाधव या जेमतेम अक्षरांची ओळख असलेल्या वीर मातेने मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता आपल्या तिनही कन्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून आदर्श पायंडा घालून दिला. जाधव यांच्या दोन मुली सध्या शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करीत आहेत. तर तिसरी कन्या कोमल हीने देखील आईचे कष्ट अन् दोन्ही बहिणींच्या आर्थिक पाठबळावर यशाचे शिखर पार केले. वंशाचा दिवा नाही, म्हणून काय झालं, जाधवांच्या घराला पणतीनेही प्रज्वलीत केले आहे. त्यामुळे अखेर आईची साधना उशिरा का होईना फळाला आली आहे.
रात्रंदिवस अभ्यास करून जिद्दीच्या बळावर उच्चपदस्थ अधिकारी होऊन कोमलने आईच्या पंखांत बळ आणले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत कोमलने नुकतेच घवघवीत यश संपादन केले आहे. जिद्दी कन्येने महिलांमधून एन.टी.( ब ) प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. तिची मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली तर मंगळवारी जाहीर झालेल्या कर सहायक अधिकारी परिक्षेत कोमल उत्तीर्ण झाली आहे. कोमलचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कडा येथे तर पदवीचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून पुण्यात झाले. तर पदवीत्तर पदवी शिक्षण लातूरला पूर्ण केले आहे. आईच्या कष्टाला हातभार लागावा, यासाठी कोमलने इंग्रजी विषयाचे क्लास देखील घेतले. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दोनदा अपयश येऊनही तिने मागे वळून पाहिले नाही. अपयश हीच यशाची पहिली पायरी समजून जिद्द कायम ठेवून नियतीला देखील झुकवले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात कोमलची कर सहायक अधिकारी पदावर निवड झाल्याची सुखदवार्ता ऐकून आईलाही आपल्या कन्येच्या यशाचे आनंदाश्रु लपवता आले नाहीत.
कोमल ही लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होती, ती म्हणायची आई मला उच्चपदस्थ अधिकारी व्हायचं असल्याचे सांगायची. ते स्वप्न तिने जिद्दीने साकारल्यामुळे अखेर आमच्या अपेक्षांची पूर्तता केली आहे.
– साधना जाधव ( आई )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here