अयोध्येत बुद्धविहार देखील उभारा

ना. रामदास आठवले घेणार योगींची भेट
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नवी दिल्ली : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्‍या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास 300 जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.
सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास 200 पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अयोध्येत बुद्धविहार उभारावे अशी मागणी केली आहे. आठवले यांनी म्हटले की अयोध्येतील जागा राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. मात्र अयोध्येत बुद्ध मंदीर असावं असा आमचा आधीपासूनचा आग्रह होता.
आठवले पुढे बोलताना म्हणाले की सरकारने जागा दिली तर ठीक आहे. नाही मिळाली तर एखादा ट्रस्ट उभा करून अयोध्येत बुद्धविहार उभे राहावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर आपण योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर अयोध्येत एखादी जागा घेऊन तिथे बुद्धविहार बांधण्याचा माझा प्रयत्न असेल असे आठवले म्हणाले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here