Karjat : सिद्धटेक येथील बौद्ध विहाराची जागा झाली अतिक्रमण विरहित

भास्कर भैलुमे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ३०

कर्जत : सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे आणि वडारवस्ती येथील ग्रामस्थांनी सिद्धटेक येथील नियोजित बौद्ध विहाराच्या जागेवर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीने अतिक्रमण केले होते. ते काढण्यासाठी मंगळवार दि २८ रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यास यश आले असून त्या जागेवरील अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे.
मौजे सिद्धटेक येथील नियोजित बौध्द विहाराची जागा असून गेल्या १० ते १२ वर्षापासून नमुना नंबर ८ च्या फाॅर्मवर नोंद आहे. या जागेवर ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकारी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केले होते. याबाबत ग्रामस्थानी सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवार दि २८ रोजी सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली वडारवस्ती येथील ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले होते.
अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच सदरची जागा नियोजित बौद्ध विहारासाठीच असून ती ताबडतोब अतिक्रमण विरहित करून मोकळी करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मंगळवारी उशिरा गटविकास अधिकारी कर्जत यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेत या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी सकाळी सिद्धटेक येथील नियोजित बौद्ध विहाराच्या जागेवरील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले असून अतिक्रमण विरहित करण्यात आली. यासह ही जागा बौद्ध विहारासाठीच राहील, अशी ग्वाही ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here