Rahuri : कांदा उत्पादकांच्या नजरा उद्या होणा-या लिलावातील बाजारभावाकडे

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधे आज रोजी तब्बल ६१ हजाराच्यावर कांदा आवक नोंदवली गेली असून कांद्याच्या यावर्षीच्या सिजनमधील ही विक्रमी आवक असल्याची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमधे येणारी कांदा आवक लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोलावली जाते यानंतर येणारी आवक स्विकारली जात नाही कांदा मोंढ्यासाठी येणारी आवक यंदाच्या सिजनमधली विक्रमी झाली असल्याने उद्या होणाऱ्या कांदा लिलावातील बाजारभाव कसे राहतील याकडे व्यापारी वर्गासह कांदा उत्पादकांच्या नजरा लागल्या आहेत.

आज सकाळपासूनच बाजारसमितीत कांदा घेवून येणाऱ्या वाहनांची रेलचेल सुरु झाली होती यात दुपारनंतर वाढ होत जावून बाजारसमितीच्या आवारात वाहनांची गर्दी वाढत गेल्याने व बाहेरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कांदा आवक घेवून आलेल्या वाहनांची नगर मनमाड राज्यामार्गावर गर्दी होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये याकरिता बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने नगरबाजूकडील रस्त्याने वाहनांच्या रांगा लावण्यात आल्या असता वाहनांची रांग बाजारसमिती पासून राहुरी खुर्द ते शनिशिंगणापुर फाट्यापर्यंत तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत दोनदा वाढत गेली होती. समितीच्या आवारातील वाहने खाली झाल्यानंतर एकएका वाहनास आत प्रवेश दिल्यानंतर वाहनांची रांग पाचवाजे दरम्यान ओसरली असता अखेरीस बाजारसमितीच्या नोंदवहीवर ६१ हजाराच्या वर आवक नोंदवली गेली. साधारणपणे १० टनी वजनाच्या तीनशे ट्रक कांदागोणी आवक झाली.

साठवणूक केलेल्या कांद्याला यंदा एप्रिलनंतर साधारणपणे पाच ते ९ रुपये किलो भाव आजपर्यंत मिळत गेला मार्चमधे काढणीला आलेला कांदा १५ रुपये दराने विकत होता. त्यानंतर बाजारभावात घसरण होऊन आजरोजी साठवणूक केलेला कांद्याला अत्यल्प दर मिळत असून तसेच यंदा कांदा खराब होण्याचेही प्रमाणात वाढ झालेली आहे. अशात एकरी उत्पादनही गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरी कमीच असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे. एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च कांदा लागवडीपासून ते काढणी नंतर साठवणूक करण्यापर्यंत गेल्याने मिळत असलेल्या बाजारभावाच्या तुलनेत कांदा उत्पादकांना कांदा नुकसानीत विकण्याची वेळ आलेली दिसून येते.
कांदा विक्री झालेनंतर मिळालेल्या पैशातून उत्पादीत खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक यंदा तोट्यात आहे. कांदा खराब होऊ नये याकरिता तसेच कोरोना संकटामुळे परराज्यातील बाजारसमिती मधूनही कांद्याला म्हणावी तशी मागणी नसल्याने तसेच निर्यातही बंद असल्याने कांदा दराची घसरण पाहता बाजारभाव वाढतील की नाही. या पेचात कांदा उत्पादक संकटात सापडल्याने मिळेल. त्या भावाने कांदा विकण्याची वेळ कांदा उत्पादकावर आली असून बाजारसमित्यांमधील आवकेत वाढच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here