Rahuri : पिंपळगाव फुनगी येथे बिबट्या जेरबंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आंबी – राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुनगी येथे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्या अलगद अडकला, असे असले तरीही परिसरात अजून एक बिबट्या असल्याची चर्चा सुरू आहे.
पिंपळगाव फुनगी, संक्रापूर, दवणगाव, आंबी, अंमळनेर, केसापूर ही गावे प्रवरानदीच्या काठी वसली असल्याने मोठा बागायती पट्टा आहे. येथे मुख्यत्त्वे ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांना आयते लपण मिळत आहे. तसेच या भागात पाळीव प्राण्यांची संख्या जास्त आढळून येते. त्यामुळे बिबटे भक्षासाठी या पाळीव प्राण्यांवर नेहमी हल्ले करतात. या भागात मनुष्य व बिबटे यांचा नेहमी संघर्ष होत असतो.
काही दिवसांपूर्वी पिंपळगाव फुनगी येथील मंच्छिद्र हुरुळे वस्ती परिसरात नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने पिंजरा लावला होता. मंगळवारी 8 वाजेच्या सुमारास त्यात भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या अलगद अडकला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर बिबट्याला डिग्रस येथील रोपवाटिकेत स्थलांतरीत करण्यात आले. असे असले तरी या भागात अजून एक बिबट्या असल्याने पिंपळगाव फुनगी करांच्या मानगुटीवरचे बिबट्याचे संकट अजून टळलेले नाहीत. त्यामुळे वनविभागाने येथे पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मागील काही महिन्यापूर्वीच श्रेया या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता.येथील नदीकाठ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here