राफेल विमाने आणि भारतीय हवाईदल

दिवाकर देशपांडे
राफेल लढाऊ विमाने गाजावाजा करीत काल भारतात आली. लोकांत भलतेच उत्साहाचे वातावरण पसरले. शरद पवार म्हणाले, ही विमाने काही गेमचेंजर ठरणार नाहीत. ते संरक्षणमंत्री होते, त्यामुळे त्यांचे हे म्हणणे बरोबरच आहे. कितीही अत्याधुनिक असली तरी ही पाच विमाने युध्दाच्या स्थितीत काही बदल करू शकतील असे मानने हा भलताच आशावाद झाला. पण भारतीय सेनादलाचे तिन्ही विभाग अपुऱ्या साधनसामुग्रीतही काय चमत्कार करू शकतात याची अनेक उदाहरणे देता येतील. शेवटी मशीनपेक्षाही मशीन चालवणाऱ्या माणसाचे कौशल्य महत्त्वाचे असते. त्यामुळे फक्त पाच राफाल विमाने काय कामगिरी करू शकतील हे सांगणे कठीण आहे. ही विमाने लगेच वापरता येणार नाहीत, ती हवाईदलात नीट रिचावी लागतील (assimilate) असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ते खरेच आहे, पण वेळ आली तर भारतीय हवाईदल थेट अंबाल्यावरून लडाखच्या युद्धक्षेत्रात ही विमाने लोटील याची मला खात्री आहे. 

कागदावर तरी चीनचे हवाईदल भारताला भारी आहे. राफाल विमानांची तुलना चीनचे पाचव्या पिढीचे युद्धविमान ‘जे-२०’ शी केली जाते. हे ‘जे-२०’ विमान चीनच्या अनेक युद्धयंत्रांप्रमाणे एक गूढ यंत्र  आहे. त्याची क्षमता काय हे कुणालाच फारसे माहीत नाही. चीनने नेहमीप्रमाणे गुप्तता पाळून अमेरिकेसह सर्वांना बुचकळ्यात पाडले आहे. माजी हवाईदल प्रमुख धनोआ यांनी त्यांना “या विमानाची का भीती वाटत नाही” याची अनेक कारणे दिली आहेत. तरीही शत्रूला कमी लेखून चालत नाही. जोपर्यंत ते विमान समोर येत नाही व त्याचे गुणदोष कळत नाहीत तोपर्यंत त्याला दुबळे मानून चालणार नाही.

चीनचे हवाईदल कागदावर तरी प्रभावी दिसते, असे मी वर म्हटले आहे, याचे कारण चीनकडील युद्धविमानांची संख्या भारतापेक्षा मोठी आहे. पण लडाख किवा तिबेटच्या भौगोलिक परिस्थितीत काम करू शकणारी त्यांची सर्व विमाने नाहीत. भारताकडे असलेली मिग, सुखॉय ही विमाने त्यांच्याकडेही आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धस्थितीत दोन्ही देशांची हवाईदले सारख्याच क्षमतेची आहेत. त्यामुळे आता सर्व काही वैमानिकांच्या कौशल्यावर व युद्धसाहित्याच्या सक्षम हाताळणीवर अवलंबून आहे. चिनी वैमानिकांचे कौशल्य कुठल्याच युद्धात अद्याप सिद्ध झालेले नाही, त्याउलट भारतीय वैमानिकांचे कौशल्य अनेक युद्धात सिद्ध झाले आहे.
विमानातून जमिनीवर जेव्हा हल्ला केला जातो तेव्हा अचूक नेम साधून लक्ष्यावर हल्ला करणे अवघड असते, त्यातही हिमालयासारखा विचित्र हवामानाचा पर्वतीय प्रदेश असेल तर हवाईदलासाठी हे काम आणखीनच अवघड होऊन जाते. पण कारगिलच्या अशाच प्रदेशात ‘मिराज-२०००’ या जुन्या विमानांनी देशात विकसित केलेल्या लेसर मार्गदर्शक प्रणालीचा वापर करून अचूक मारा केला व कारगिलचे युद्ध संपुष्टात आणले, हे लक्षात आणले तर भारतीय हवाईदल हिमालयात काय कामगिरी करू शकते याची कल्पना यावी. शेवटी युद्ध नुसत्या बळाने जिंकता येत नाही, त्याला कौशल्याची व शौर्याचीही जोड द्यावी लागते. त्यामुळे राफाल विमान असो किवा नसो कौशल्य आणि शौर्य याला पर्याय नाही. त्यात भारतीय सेनादले कमी पडलीत, असे अजून तरी दिसून आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here