!!भास्करायण !! एकाधिकारशाहीचा येळकोट आणि लोकशाहीचा कडेलोट!!

भास्कर खंडागळे ,बेलापूर (९८९०८४५५५१ )
भारतातील राजकारणाची सध्या जी वाटचाल दिसते आहे ती एकूणच लोकशाही संपवण्याकडे जाताना दिसते आहे. राज्यांमध्ये लोकशाही पध्दतीने सरकारे येतात.जनता अशी सरकारे मताव्दारे निवडून देते. ही जनादेशाची सरकारे निवडून येतात, ती विविध प्रलोभने दाखवून पाडली जात आहेत. प्रामुख्याने केन्द्रातील भाजप पक्ष याबाबत आघाडीवर आहे. काँग्रेस या पक्षाची सरकारे पाडून स्वपक्षाचे सरकार स्थापित करणे एवढाच  एककलमी कार्यक्रम सध्या राबविला जात आहे.
‘काँग्रेसमुक्त भारत’ हे भाजपचे उद्दीष्ट आहे.ते जरुर असावे. जनादेशाच्या माध्यमातून देश काँग्रेसमुक्त केला, तर हरकत नाही वा आक्षेपाचे कारणही नाही. पण, ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत आमदारांचा  घोडेबाजार करणे.विविध प्रलोभणे दाखवून विरोधी पक्ष फोडणे ,हे समर्थनिय ठरत नाही. गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश सर केल्यावर आता राजस्थान येथे ऑपरेशन लोटस सुरु आहे. महाराष्ट्रातही या ऑपरेशनपूर्व भूल देण्याची तयारी केली जात आहे.
एकीकडे काँग्रेसची सरकारे पाडली जात असताना देशातील प्रादेशिक पक्षांची सरकारे मात्र पाडली जात नाहीत.त्यांना हात लावण्याची वा त्यांचेवर ऑपरेशन लोटस करण्याची हिंमत केली जात नाही. कारण ही अस्मिता गमावलेली काँग्रेस नाही.  प्रादेशिक पक्षांची सरकारे, प्रादेशिक अस्मितेची  आहेत. त्यांना नख लावले तर आपलाच घात होईल,आपल्याच पायावर धोंडा पडेल याची पुरेपूर जाण भाजपला आहे. यापेक्षा ही सरकारे पाडण्याइतका भाजप त्या राज्यांत ताकदवान नाही, हे अधिक वास्तववादी ठरते.
भाजपने ‘काँग्रेस मुक्त भारत’ असा जो नारा दिला होता तो प्रत्यक्षात आणण्याकडे भाजप अग्रेसर होत आहे, असे स्पष्ट दिसते आहे. विविध राज्यात जे प्रादेशिक  राजकीय पक्ष आहेत त्यांच्या पासून भाजपला देश पातळीवरील धोका नाही. कारण प्रादेशिक पक्ष  केंद्रीय सत्तेला आव्हान देतील अशी शक्यता. त्यामुळे  काँग्रेस पक्ष मैदानातच नसेल तर विविध राज्यांतील पक्ष मिळून युपीएसारखे गठबंधन तयार होणेही शक्य नाही. भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकजूट होणेचीही  शक्यता उरणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे उच्चाटन केले ,तर भाजपच्या केंद्रीय सत्तेला धोका उरणार नाही. या साठी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नष्ट करणे भाजपला आवश्यक वाटत असावे. काँग्रेसमुक्तीमागे हा मुख्य हेतू आहे.तो साध्य करण्यासाठीच ऑपरेशन लोटसचा सपाटा सुरु आहे. काँग्रेस व्हेंटिलेटरवर असतानाच ऑपरेशन करणे योग्य, यासाठी सरकारे पाडण्याचा भाजपकडून धुमधडाका सुरु आहे.
आता भारतात जी काही आणि ज्या रुपात लोकशाही अस्तित्वात आहे ती वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. हा जो एक पक्षीय हुकुमशाहीचा बनाव समोर ठाकला आहे. तो लोकशाही गिळंकृत करणारच. परंतु सामाजिक दृष्ट्या विचार केला तर इथल्या बहुसंख्य वर्गासाठी अशी सत्ता म्हणजे सामाजिक वर्चस्ववादी सत्ता ठरेल. एक पक्षीय हुकुमशाहीची सत्ता ठरेल.
आज जगात राष्ट्रवाद आणि सोबतीने वर्णवाद उफाळून आलाय. भारतातही हीच वाटचाल सुरु आहे. लोकशाही नामक प्रकार सत्ताधारी भाजपला अमान्य आहे असेच सरकारे पाडण्यातून दिसते. तसेच विशिष्ट घटकाविरुध्द द्वेष पेरुन पध्दतशीरपणे धृवीकरण केले जात आहे. हे लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या भवितव्याचेदृष्टिने अधिक धोकेदायक आहे.
प्रश्न काँग्रेसची सरकारे पाडणे हा नसून, सौदेबाजी करुन स्वपक्षाच्या सरकारांची प्राणप्रतिष्ठा करणे हा आहे. जी सरकारे जनादेशाने विराजमान होतात ती पाडून, ज्याविरुध्द जनादेश दिला त्यांनी सत्तेत बसणे, हा जनादेशाचा अवमान  ठरतो. लोकशाहित लोकांच्या मतांना किंमत असते. लोक आपले हित कशात आहे हे बघून सरकार निवडते. त्यामुळे अशी सरकारे पाडणे हा जनतेचा अवमान आणि लोकशाहिचे अवमूल्यन ठरविले पाहिजे.
लोकशाही जीवंत ठेवणे हे सर्व लोकशाहीवाद्यां समोरचे आजचे आव्हान आहे. त्यासाठी एकजूट होईल का हा प्रश्न आहे. तशी शक्यता आजतरी दिसत नाही. सक्षम सरकार आणि सबाळ विरोधी पक्ष हा लोकशाहिचा आत्मा आहे.हा आत्माच गमावला तर मग एकाधिकारशाही दूर नाही,असा ईशारा द्यावासा वाटतो. आज ज्या पद्धतीने पक्ष फोडणे सुरु आहे. यात मोठे आर्थिक व्यवहार होत आहेत. यामुळे लोकशाहीचा मिनाबाजार बनला आहे.
अर्थात या घोडेबाजाराची सुरुवात काँग्रेसनेच केली हा ईतिहास आहे. सन १९६९ च्या काँग्रेस फुटीनंतर फोडझोडीला ऊत आला. त्यानंतर विरोधक फोडून त्यांना दुबळे करणे हा खेळच काँग्रेसने सुरु केला. काँग्रेसने जे पेरले तेच आज काँग्रेसवर उलटत आहे. हे खरे असले, तरी सध्या सरकारे पाडापाडीची रित आहे व संस्कृती आहे तिचे समर्थन करता येणार नाही. असे समार्थन केले तर ते एकपक्षिय एकाधिकारशाहीचा येळकोट, तर लोकशाहीचा कडेकोट ठरेल!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here