शितलतरंग, हवा हवासा श्रावण….!! 

शितल चित्ते मलठणकर[पुणे], (९८५०८८८४०४)

“श्रावण मासी हर्ष मानसी,
       हिरवळ दाटे चोहीकडे, 
क्षणात येते सरसर शिरवे,
       क्षणात फिरुनी ऊन पडे……”
बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांनी लिहून ठेवलेल्या ओळी किती समर्पक वाटतात. निसर्ग सृष्टी श्रावण महिन्यात न्हाऊन  निघालेली असते. असह्य  उष्म्यानंतर जीवनात सुख आणि उमेद घेऊन येणारा ऋतू.

वरुण राजाच्या कृपेने चोहीकडे निसर्गाने नववधूसारखा हिरवा शालू लेवून वेगवेगळ्या रंगांची उधळण केलेली असते. पोपटी, हिरवा, गडद हिरवा अशा वेगवेगळ्या छटांनी वेली- झाडांना नवती फुटू पाहत असते. जणू उदरातून नवीन जीव जन्माला येत आहेत. उन्हाची लाहीलाही संरुन हवेत मंद गारवा पसरलेला असतो. गवतेही आपली पिवळी कात टाकून हरित वस्त्रे परिधान करितात. पहाटेच्या गारव्यात रात्री पडून गेलेल्या पावसाचे थेंब गवतावर मोत्याप्रमाणे भासतात.

अवचित दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य सृष्टीला जणू मुकुटच चढवते. श्रावण महिना तसा खूप लपाछपीचा वाटतो. ऊन पडता-पडता अचानक पावसाच्या सरींवर सरी कोसळू लागतात. हा ऊन-पावसाचा खेळ बघून मन हरखून जाते. “जल ही जीवन आहे” ही पंक्ती खऱ्या अर्थाने सिद्ध होऊ पाहते. कारण पाण्याचे सगळे स्त्रोत डोंगर-दऱ्यावरून येऊन नदी-नाले, तळे, तलावात सामावून गेलेले असतात.

” ये ग ये ग सरी…. “म्हणत लहान मुले होड्या पाण्यात सोडून रिमझिम सरीत भिजायचा मनसोक्त आनंद लुटतात. पाऊस चालू असताना गरमागरम भजी आणि खिडकीत उभा राहून वाफाळलेला चहा, कॉफीचा कप हातात घेऊन अंगावर तुषार घेण्याचा अनुभव केवळ अवर्णनिय श्रावण महिन्याची सर्व स्त्रिया आतुरतेने वाट पाहत असतात. कारण, याच महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे नागपंचमी, गोपाळकाला, नारळी पौर्णिमा ,बैलपोळा ,मंगळागौर इत्यादी सण साजरे होतात. सणांमुळे स्त्रियांना मुलींना नटायला, हौसमौज करायला मिळते. उपवासाच्या, गोड पदार्थांची घरात रेलचेल असते .सगळीकडे कसे उत्साहाचे वातावरण असते.

या महिन्याची चातकासारखी वाट पाहत असतो तो आपला ‘बळीराजा’ !कारण, हा ऋतू पिकांसाठी जीवनदायी ठरतो. पावसाच्या सरींच्या स्पर्शाने हिरवीगार पिके आनंदाने डोलत असतात. त्यामुळे सगळीकडे शेतकरीवर्ग सुखावलेला असतो. परमेश्वराने त्यांना दिलेलं हे वरदानचं जणू.

वर्षा हा ऋतू आपल्यासाठी अजून खूप आनंद लहरी घेऊन येत असतो. त्यामुळेच भारतात हा ऋतू खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. मन कितीही खिन्न असले तरी जीवनात सुख आणि नवीन उमेद घेऊन येणारा हा ऋतू सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा.    सगळीकडे प्रफुल्लित वातावरणामुळे प्रत्येकाच्याच मनात मनमोर पिसारा फुलवून  नाचत असतो.जलधारेच्या लयीवर फेर धरित असतो…
*r

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here