!!भास्करायण !! राखी बांधणा-या बहिणींनो, भावांना वाचवा !

भास्कर खंडागळे ,बेलापूर (९८९०८४५५५१)

“सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती. ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची रे ‘वेडी माया’ ” भाऊ-बहिण यांच्यातलं नातं, त्यांच्यातल्या प्रेमाला ‘वेडी माया’ संबोधनं खरंच किती सोप्या पण तितक्याच अर्थपूर्ण शब्दात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उलगडा या गीतात केलाय.

हे गाणं आठवायचं कारण म्हणजे ऊद्या राखी पौर्णिमा आहे. त्याचं काय आहे, जुनं गेलं आणि नवं युग आलंय. आजच्या नव्या युगात संक्रांत, पाडवा, दसरा असले सण-उत्सव ‘बॅकवर्ड’ बनलेत. त्या जागी व्हॅलेंटाईन डे, टिचर्स डे, फादर डे, मदर डे, फ्रेंडशीप डे, पॅरेन्ट डे असल्या ‘डे’ चा सुळसुळाट झालाय. क्रिकेटच्या वन ‘डे’ चं वारं आपल्या संस्कृतीतल्या सण-उत्सवामध्ये घुसू लागलंय. या वार्‍याच्या मार्‍यानं आपल्या संस्कृतीचा तंबू उखडतोय की काय या भितीनं आम्ही व्याकूळ झालोय.

नव्या ‘डे’ संस्कृतीत कदाचित राखी पौर्णिमा शब्द पुसला जाईल आणि त्याची जागा ‘ब्रदर-मिस्टर रिलेशन डे’ घेईल की काय अशी स्थिती आहे!असो! शेवटी’ कालाय तस्मै नम:’ तर काय, ऊद्या राखी पौर्णिमा. आजच्या भाषेत ब्रदर-सिस्टर रिलेशन डे! करेक्ट तर आम्हास प्रश्न असा पडलाय की, खरं सांगा, किती बहिणींचा आपल्या सामाजिक भावांच्या मनगटावर विश्वास राहिलाय हो? अगदी लाख मोलाचं आणि मनातलं बोललो की नाय? आता आमच्या या टिपणीमुळं अनेक भाऊ आमच्यावर कावतील. दात ओठ खातील. मनातल्या मनात आम्हाला शिव्या घालतील. आता सामाजिक भावांची मनगट कशीही असली तरी बिचार्‍या बहिणींना राखी बांधण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं ‘रिती-रिवाज’ पूर्ण करण्यासाठी समस्त बहिणी आपल्या सामाजिक भावांना राखी बांधून मोकळ्या होतील!

बहिणीनं हातावर राखी बांधली, आरतीचं ताट तोंडासमोरुन फिरवलं, त्या ताटात खिशात असलेले पाच-दहा रुपये ‘ओवाळी’ ताटात टाकली की, भाऊ मोकळे! कसलं आलंय रक्षा बंधन! त्यात सामाजिक भावांचा तरी काय दोष? जमानाच बदललाय म्हटल्यावर भाऊ सुद्धा बदलणारच ना! मला सांगा आजच्या ‘गुटखा आणि मटका’ तसेच ‘लटका आणि झटका’ युगात कुठून शोधायचे बहिणींसाठी छातीची ढाल करणारे भाऊ?. आजचे भाऊ छाती फाडतील तर गुटख्याच्या पुड्या नाही तर सिगारेटचा धूरच धूर बाहेर पडेल!असो.

आता असले बहाद्दर भाऊ असतील आय मिन असल्या ‘भरदार’ छातीचे आणि ‘पिळदार’ शरीराचे भाऊ असतील, तर बहिणी भाग्यवानच नाही कां? असले भरदार छातीचे भाऊ आहेत म्हणून तर महाविद्यालयीन मुलींची छेडछाड, तरुणींचा विनयभंग, अबलांवर बलात्कार, हुंड्यासाठी छळ, नवविवाहितांची जाळपोळ असले प्रकार घडत आहेत. अनेक भगिनी भर रस्त्यात मारल्या गेल्या. आपले सामाजिक भाऊ बसले पानटपरीवर तंबाखूला चूना चोळीत! अशा कितीतरी भगिनी रोज संकटात सापडत आहेत. दृष्ट प्रवृत्तीच्या शिकार होत आहेत. भगिनींचे भाऊ हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून गपगार! व्वा रे बहाद्दर सामाजिक भावांनो! तुमच्या सारखे भाऊ मिळायला खरंच नशिब लागतं रे बाबांनो! उगाच नाही तुमच्या सारख्या बहिणींची रक्षा करणार्‍या सामाजिक भावांसाठी ‘रक्षाबंधन’ सोहळा रिझर्व्ह ठेवलाय!

कोण्या एकेकाळी बहिणीची अब्रु राखणारे आणि त्यासाठी प्रसंगी दोन हात करणारे भाऊ होते. त्या हातांवर राखी बांधताना बहिणींनाही धन्य वाटत होतं. कुठं गेले ते हात तेच कळत नाही. पाश्चिमात्य ‘डे’ संस्कृतीनं सगळा इचका करुन टाकलाय. भोगवाद, चैन, ऐश बस्स संपलं आयुष्यातलं काय! जन्मा आला हेला, पाणी वाहून मेला ऐवजी ‘जन्मा आला हेला अन् चैन करुन मेला’ अशी अवस्था झालीय. आपण कुठून आलोय अन् कुठं चाललोय हेच कळत नाहीय. सगळं बावचळल्यागत! आपले सण-उत्सव सोडायचे अन् परकीय कंपन्यांनी स्वत:चे धंदे वाढविण्यासाठी सुरु केलेले अमुक डे, तमुक डे, फलाना फेस्टीवल अन् बिस्ताना फेस्टीवल स्विकारायचे. असं अनुकरण करीत राहिलो, तर मला सांगा आपली संस्कृती कशी शिल्लक राहिलं हो?ह्या ‘डे’ च्या दिवशी ग्रीटींग कार्ड धाडायचं किंवा गिफ्ट पाठवायची की झालं प्रेम व्यक्त! यंव रे यंव! इतभर कार्डावर प्रेम सामावत असतं? त्यासाठी ‘वेडी माया’ चं असावी लागते. ही वेडी माया उरली नाही म्हणून तर प्रेमाच्या बाबतीच अवस्था कोरड्या विहिरीसारखी सारखी कोरडी झालीय!

तर बहिणींनो, अशी समाजातल्या तुमच्या भावांची अवस्था आहे. छातीचा पिंजरा अन् दंडाची झाडू झालीय. तमाम भावांना चंगळवादी आणि भोगवादी संस्कृतीने गुरफटून टाकलंय. त्यामुळं त्यांना समाजातील असाहाय बहिणी कुठच दिसत नाहीत! दुसरं म्हणजे गुंडप्रवृत्ती, अपप्रवृत्ती विरुद्ध लढायची हिंमत हवी. अशी हिंमत असती तर काय बिशाद छेडछाड, हुंडाबळी, बलात्कार असे प्रकार होण्याची?

मागील वर्षी एका विद्यार्थीनिशी शिक्षक महाभागाने लगट केली. या विद्यार्थीनीने सामाजिक भावांची वाट न बघता पायातल्या खेटरानं त्या लंपट शिक्षकाची धुलाई केली. शाब्बास बेटी! आता बहिणींना याच पद्धतीनं जावं लागेल. सामाजिक भावांची वाट बघत बसाल तर हाती निराशाच पडेल. बहिणींनो, भावांच्या मनगटावर राखी ऐवजी बांगड्या घाला! बघू बदलले तर बदलले भाऊराया… तेव्हा बहिणींनो आता तुम्हीच धावा आणि चंगळवादात अडकलेल्या भावांना वाचवा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here