Kada : आष्टी ठाण्यात पोलिस निरिक्षक रुजू होताच, पहिल्याच दिवशी चोरांची सलामी ?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | कडा

नवीन साहेब फार कडक आहेत, असा गाजावाजा करणा-या पोलिसांना चोरांनी मोठीच चपराक लगावली असून नव्याने आलेले पोलिस निरिक्षक रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी कडा येथे महामार्गावरील चार ठिकाणी चोरी करीत पोलिसांचा दावा चोरट्यांनी पोकळ ठरवला आहे.
आष्टी तालुक्यातील मागील दोन ‌वर्षाचा कालावधी पाहिला तर आतापर्यंत कड्यासह आष्टी येथील दोन डझनहुन अधिक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. यापुर्वीचे पोलिस निरिक्षक हे ब-याचदा पोलिस ठाण्यात बसून कारभार करत असल्याने त्यांचा जनमाणसांत कसलाच वचक  नव्हता. तर दुसरीकडे खास ठराविक कर्मचारी ठाणे प्रमुख म्हणून वावरत असायचे. त्यामुळे अवैद्य करणा-यांचे मनोधैर्य निर्धावलेले होते. त्यामुळे आष्टीत तर यापुर्वी भरदिवसा चोरीच्या घटना घडल्या होत्या. अशा घटनांमधील चोर पकडणे तर दूरच, परंतू तत्कालिन पीआय महाशयांनी आठवडी बाजारातील मोबाईल चोरणारे भुरटे चोर देखील पकडल्याचे नागरिकांच्या  ऐकिवात नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांत अकार्यक्षम अधिकारी म्हणून प्रतिमा बनली होती. त्यामुळे निवृत्तीच्या आधीच त्यांना नारळ देण्याची तयारी राजकीय वर्तुळात बोलली जात होती. मात्र आता अखेर निवृत्तीला काही दिवस उरले असतानाच, त्यांना रजेवर पाठविण्यात आल्याची पोलिसांत चर्चा रंगली आहे.
नव्याने आष्टी पोलिस ठाण्यात रुजू झालेले पोलिस निरिक्षक कडक आहेत, अशी चर्चा काही पोलिसांनी गाजावाजा करण्यास सुरुवात देखील केली होती, परंतू चोरांनी कड्यात रविवारी रात्री चार ठिकाणी चोरी करून पोलिसांचा दावा पोकळ ठरवला आहे. यापूर्वी जेवढ्या चो-या झाल्यात, त्यापैकी अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाहीये. मागील जुलै महिन्यात कड्यात एकाच रात्री पाच ठिकाणी आणि काल रविवारी चार ठिकाणी अशा नऊ वेळेस चोरीचा प्रकार घडला आहे. मात्र चोरीचा तपासच लागत नाही, म्हणून त्याची फिर्याद देखील लोकांनी दाखल केलेली नाही. त्यामुळे नव्याने आलेले पोलिस निरिक्षक भयभीत झालेल्या लोकांचे मनोधैर्य वाढवून पोलिसांप्रती जनतेच्या मनात विश्वास दृढ करण्यासाठी व चो-यांचा तपास लावण्यासाठी पुढाकार घेणार काय, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here