पोलीस चौकीला विरोध करून काय साधणार? : गवारे

0

लोकप्रतिनिधींनी पोलीस खात्यास बदनाम करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शिरसगाव: हरेगाव-अशोकनगर फाटा येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि उद्योजक, व्यावसायिकांच्या मदतीने उभारलेल्या पोलीस चौकीला विरोध करून आमदार लहू कानडे यांना काय साधायचे आहे? असा सवाल शिरसगावचे माजी सरपंच अण्णासाहेब गवारे यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी या नात्याने कानडे यांनी विकासकामात खोडा न घालता पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही गवारे यांनी केले आहे.

अनेक वर्षापासून या भागात चोऱ्या, मंगळसूत्र ओरबाडणे अशा अनेक घटना होत होत्या. पोलीस चौकी नसल्याने गुन्हेगाराना अभय मिळत होते. इंदिरानगर, प्रगतीनगर, आशीर्वादनगर, वडाळा, अशोकनगर, शिरसगाव, या परिसरात काही अशी घटना घडल्यास थेट श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला जावे लागायचे. आता हरिगाव फाट्यावर नव्याने अशोकनगर पोलीस चौकी उभारण्यात आल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासाठी शहर पोलीस स्टेशन निरीक्षक श्रीहरी बहिरट व अधिकाऱ्यांनी जनहिताच्या दृष्टीने नागरिकांच्या मदतीने विना लोकवर्गणी पोलीस चौकी उभारणे हे अतिशय चांगले काम केले. त्या कामाचे कौतुक करण्याऐवजी श्रीरामपूरचे आमदार कानडे यांनी ही चौकी कशी उभारली? याची विचारणा केली, ही खेदाची बाब असून त्यास विरोध करणे हे अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिरसगाव माजी सरपंच अण्णासाहेब गवारे यांनी दिली.

मार्चपासून आपल्या कोरोनाचा प्रादुर्भाव सूर झाला आहे. वाढत चालला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. लोकांना मास्क लावण्यासाठी सूचना करीत असताना हरिगाव फाट्यावर ऐन उन्हाळ्यामध्ये पोलीस स्टाफ, अधिकारी उन्हात जनजागृतीसाठी आपले कार्य करीत होते. मार्चनंतर दोन तीन महिने झाले. त्यावेळी वडाळा येथील ओकवूड वायनरीचे उत्तम केवल या एका कारखानदाराने ही परिस्थिती पाहिली व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना भेटून तुमचा स्टाफ उन्हात काम करतो जवळ पाणी, शेड आदी सुविधा नसल्याने मी तुम्हाला निवारा केंद्र बांधून देऊ इच्छितो, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी जागा पाहीली व जागा मालकाला कोरोना प्रादुर्भाव, जनजागृतीसाठी जागेची विचारणा केली. त्यावेळी लगेचच माहेश्वरी स्टील कोर्पोरेशन चे मालक दीपक माहेश्वरी यांनी आपल्या ३३ गुंठे जागेपैकी ५०० स्क़्वे.फुट जागा जनहिताच्या कामासाठी देण्याचे मान्य केले. तसेच त्यासाठी शिरसगाव ग्रामपंचायतीने जागेस मंजुरी दिली. खरेदी झाली. सीसीटीव्ही कॅमेरे, बोअर, पाईपलाईन करून दिली. चौकीचे बांधकामही कारखानदाराने पूर्ण करून दिले आहे. इतर छोटी मोठी कामे त्या भागातील असणाऱ्या महालक्ष्मी स्टील, हनुमान स्टील, अभियंता संदीप चव्हाण दुकानदारांनी सहकार्य केले. शिरसगाव सरपंच आबासाहेब गवारे व सहकाऱ्यांनी वीजपुरवठा मीटरकामी सहकार्य केले.

कोरोना महामारी संकटामुळे उन्हात पोलीस प्रशासन काम करायचे याची दखल घेतल्याने हे काम पूर्ण होऊन निवारा केंद्र उभारले..ह्या कामात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.याची आम्हाला खात्री आहे.या कामी पोलीस उप अधीक्षक राहुल मदने,पो.निरीक्षक,श्रीहरी बहिरट,आदींनी सहकार्य केले त्यांना शिरसगाव परिसर ग्रामस्थांनी चौकी उभारल्याबद्दल धन्यवाद दिले व चांगल्या कामास कोणीही अडथळा आणू नये असे आवाहन माजी सरपंच अण्णासाहेब गवारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here