Editorial : श्रद्धेचे पैशातील मोल

राष्ट्र सह्याद्री 4 ऑगस्ट

साधू-संताच्या लेखी पैसा, संपत्ती ही मातीसमान असते. त्यांना पैशाचा मोह नसतो. तसेच देव मंदिरात नसतो, तर तो प्रत्येक माणसांत असतो, असे संत सांगतात. वारकरी संप्रदायातील अनेक संत पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाऊ शकले नाही. त्यांनी मुळा, भाजीत देव पाहिला. वारकरी संप्रदाय मुळातच बंडखोर वृत्तीचा. राजकारण्यांच्या आहारी संतानी जाऊच नये. आपल्या ध्येयासाठी संत कुणासमोरही कधीच हात पसरत नाहीत. परमेश्वरावर गाढ श्रद्धा असेल, तर भक्ताला जे हवे आहे. ते त्यांना मिळायलाच हवे. एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजली जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे किळसवाणे प्रदर्शन, उग्र भाषा यांनी घेतली आहे. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामूहिक स्खलन झाले आहे.

संतांनी समाजाला योग्य मार्गावर आणण्याचे काम करायचे, तर तेच आता गटबाजीत, पदात, आखाड्यात रमायला लागले आहेत. राजकारण्यांची भाषा बोलायला लागले आहेत. संत म्हणणारेच आता विषयपोभागात अडकत चालले आहेत. आलिशान वाहने, दिमतीला नोकर-चाकर, मार्गदर्शनासाठी ठराविक रक्कम यांचा मोह होतो. ऐतखावू, दुटप्पी, लोकांची लूट करणा-यांत आता सध्याच्या कथित संतांची उठबस वाढली आहे. राजकारण्यांशी त्यांची सलगी वाढते आहे. संतांना हा राजकारणी जवळचा, तो शत्रूपक्षातला असे वाटायला लागले आहे. विश्वस्त संस्थेवर नेमणूक असलेल्या कथित संतांनी तर अतिशय जबाबदारीने वागायला हवे.

कुणी काय बोलले, काय कबूल केले आणि ते दिले नाही, तरी त्यांनी त्यावर भाष्य करायचे नसते. माध्यमे अडचणीत आणणारे प्रश्न विचारत असतात. त्या वेळी सावध राहून उत्तर द्यायचे टाळायचे असते. विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षाने अशा प्रश्नाचे उत्तर देतानाही अचूक माहिती द्यायला हवे. आपले आदर्श जर चुकीचे असतील, तर ती चूक आपली आहे. आपण केलेल्या चुकीच्या मूल्यांची पेरणी आज आपणच भोगत आहोत. या सामूहिक अध:पतनास समाजातील एक घटक म्हणून आपण सर्वंच जबाबदार आहोत. ही जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे. पार भुसभूशीत झालेल्या पायावर उभी केलेली इमारत वरून कितीही देखणी असली, तरी आतून मात्र पोकळ राहणारच.

मंदिराची बांधणी करताना सामाजिक मंदिरही तितकेच मजबूत असायला हवे. पुरुषोत्तम रामाने स्वतःच्या आदर्श वर्तनाने एक मापदंड निर्माण केला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीही कोणाला दुःखावले नाही. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढताना मर्यादा भंग केल्या नाहीत, म्हणून तर त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. हे एवढे नमूद करायचे कारणही तसेच आहे. शिवसेनेने राम मंदिराला एक कोटी रुपये दिले, की नाही हा वादाचा मुद्दा झाला. भगवान श्रीरामावरील श्रद्धा पैशात मोजायची नसते.

राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. ज्यांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा ज्यांच्या रथयात्रेमुळे पाडला गेला, त्यांना बोलवण्याचे टाळले आहे. त्यांना बोलवण्यात येईल, असे सांगताना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले, की नाही या प्रश्नावर राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी ज्यांना यायचे असेल, ते येऊ शकतात. असे सांगितले. एकीकडे अयोध्येत फक्त १७० लोकांना परवानगी द्यायची, अन्य कुणाला अयोध्येत येण्यासाठी परवानगी द्यायची नाही, निमंत्रितांना ई-मेल पाठवायचे असा परस्परविसंगत कृती केली जात आहे.

आता तर अखिल भारतीय संत समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना असभ्य भाषेचा प्रयोग केला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिला होता. संतांनी टीका-टिप्पणी करायची नसते. राग, लोभ, मत्सर आदी षडरिंपूंपासून दूर राहायला हवे. ही तर संतांची लक्षणे आहेत. संत समिती म्हणायचे आणि आणि त्यातील संतांनी राग, लोभ,मत्सर, टीकेत सहभागी व्हायचे, ही संतांची लक्षणे नक्कीच नाहीत. उद्धव यांच्या मताला प्रतिवाद करूच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या मताला आक्षेप घेतला होता. भाजपने केलेल्या टीकेला आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्याचे कारण भाजप आणि शिवसेना हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत.

राजकारण, शह-काटशह, राजकीय फायदा-तोटा याचे गणित राजकीय पक्ष करीत असतात. संत समितीने या भानगडीत पडायलाच नको. संत समितीने त्याहीपुढे जाऊन टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य वारशावर उद्धव  यांनी कब्जा केला आहे. उद्धव इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकले. त्यांना काय माहिती व्हर्च्युअल आणि वास्तविक पूजेतला फरक, अशी टीका करताना असभ्य भाषेचा वापर अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस जितेंद्रनंद सरस्वती यांनी केला. वडिलांच्या वारशावर पात्रता नसलेला मुलगा बसला आहे.

त्यांना धर्म- आध्यात्माची भाषा ही राजकारणाचीच भाषा वाटते. हे अतिशय दुःखद आहे. इटालियन बटालियनच्या आश्रयाला गेल्याने या पेक्षा वेगळे काय होणार आहे, असा सवाल करताना त्यांनी त्यात सोनिया गांधी यांनाही ओढळे. ही टीका करताना त्याच सोनिया गांधीय यांचे पती राजीव गांधी यांनी राम मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले होते, याचा विसर त्यांना पडला असला, तरी खा. सुब्रमण्यम स्वामी यांना पडलेला नाही. त्यामुळे तर त्यांनी राम मंदिर बांधकामाला सुरुवात होत असल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही राजीव गांधी यांचे आहे, असे उद्गार काढून हिंदुत्त्ववाद्यांना घरचा आहेर दिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम राम मंदिराला पाठिंबा दिला. शिवसेनेने भाजपबरोबर असताना आणि नसतानाही राम मंदिर बांधकामाचे समर्थन केले. वादग्रस्त वास्तू पाडली गेली, तेव्हाही भाजप आणि संघ परिवारातील कुणीही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा बाळासाहेबांनी तिचे समर्थन केले होते. शिवसैनिकांनी वादग्रस्त ढाचा पाडला असेल, तर त्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे बाळासाहेबांनी म्हटले होते. त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस कुणीच करीत नव्हते. उद्धव यांच्यावर मात्र कुणीही उठते आणि टीका करते. राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला अनेक उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आले आणि राम मंदिराच्या मुद्यावर आणि प्रखऱ हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आतापर्यंत भाजपला साथ दिलेल्या आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात काय ठरले, याची अंमलबजावणी करण्यास नकार दिल्याने शिवसेना बाजूला झाली, म्हणून निमंत्रणच द्यायचे नाही, हे स्वार्थी राजकारण आहे आणि त्यात संतांनी पडायचे काहीच कारण नाही.

राम मंदिर उभारण्यात त्यांचाही हातभार असणार आहे, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे उद्धव यांच्यावर असभ्य भाषेत टीका करायची, याला दांभिकपणा नाही, तर काय म्हणायचे? छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठविलेला नजराणा परत करणारे संत तुकाराम कुठे आणि राम मंदिराच्या बांधकामासाठी पैसे द्यावेत, म्हणून त्यांना पायघड्या घालणारे संत कुठे? साडेतीनशे वर्षांत संत किती बदलले आहेत आणि ते षडरिपूंच्या कसे आहारी जात आहेत, यासाठी हे एकच उदाहरण नाही. कुंभमेळ्यातील त्यांच्या लढाया वेगळे काही सांगत नाहीत. रामराज्य विश्वासावर, आदर्शावर उभे होते. आताचे राजकारणी त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत.

राजकारणी बिघडले, म्हणून संतांनीही पतीत व्हायचे का, हा खरा प्रश्न आहे. संत आणि राजकारणी तसेच सामान्यांत मग काय फरक उरला? शिवसेनेने राममंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती; मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचे राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले; मात्र 27 जुलैला म्हणजे ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दान ट्रस्टकडे जमा केल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. 28 तारखेला हे पैसे जमा झाल्याची पोहच आली असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टला पैसे मिळाले की नाही, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here