Editorial : बिहारविरुद्ध महाराष्ट्र

0

राष्ट्र सह्याद्री 5 ऑगस्ट

संघराज्य पद्धतीत प्रत्येक राज्याने दुस-या राज्याशी सामंजस्याने वागायचे असते. परस्परांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची असते. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या पक्षांची सरकारे असली, तरी प्रशासन नावाची यंत्रणा असते. तिने दोन्ही राज्यांत तिढा होणार नाही, हे पाहिले पाहिजे. पाणी व सीमांवरून राज्या-राज्यांत वाद झाले आहेत. ते सामंजस्याने किंवा न्यायालयीन मार्गाने सोडविले जातात. गुन्हा एखाद्या राज्यात घडला असेल आणि फिर्याद दुस-या राज्यात दिली गेली असेल, तर तपासासाठी ती फिर्याद झिरो क्रमांकाने गुन्हा घडलेल्या राज्याकडे वर्ग करायला हवी. एखाद्या घटनेत दुस-या राज्यातील पोलिसांनी तपास सुरू केला असेल, तर त्याला समांतर तपास करायचे काहीच कारण नसते. त्यातून तिढा वाढतो. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून  महाराष्ट्र आणि बिहारमधील पोलिसांत जे वाद, श्रेय-अपश्रेयाचे राजकारण, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यावरून राजकीय नेत्यांनीही जी भूमिका घेतली आहे, त्यामुळे तपास बाजूला राहण्याची भीती व्यक्त होत आहे. 

बिहार विधानसभेत सुशांतसिंह मृत्युप्रकरणाचा मुद्दा उचलला गेला. विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव यांनीदेखील सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. बिहार विधानसभेतील सर्वंच राजकीय पक्षांनी सीबीआय चाैकशीची मागणी करण्याचा ठराव केला. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारचे मंत्री जय सिंह यांनी

महाराष्ट्र सरकार हे देशाच्या संघराज्यीय रचनेच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर बिहार विधानसभेत गोंधळही झाला आहे. बिहारमधील पाटण्याचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केल्यानंतर या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तिवारी यांच्यासोबत जे काही झाले, ते चांगले झालेले नाही, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारशी बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या प्रकरणाचे पडसाद बिहार विधानसभेत उमटले.

मुंबईत बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या तपासामध्ये मुंबई पोलिसांचे सहकार्य न मिळण्याबाबत जय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पूर्वी बिहारचे मंत्री संजय झा यांनीदेखील हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी लोकांच्या मनात असलेला संशय यामुळे अधिक बळकट होईल, असे वर्तन कोणत्याही सरकारने करू नये; परंतु दोन राज्यांत आता जे सुरू आहे, ते योग्य नाही. सुशातसिंह याच्या मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांनी तपास सुरू केल्यापासून या प्रकरणावर वाद वाढत चालला आहे. बिहारचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस समोरासमोर उभे ठाकले आहेत.

तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर प्रतिक्रियांचे युद्धच सुरू झाले आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून गेल्या आठवडाभरापासून बिहारचे चार पोलिस अधिकारी मुंबईत तपास करत असून ते मुंबईच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. बिहारचे एक पथक मुंबईत येऊन गेले, त्या पथकाला क्वारंटाईन का केले नाही, तसेच तिवारी यांनाही विमानतळावर क्वारंटाईन का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यातही तिवारी यांना भारतीय पोलिस सेवेतील अधिका-यांच्या वसतिगृहात का क्वारंटाईन केले नाही, यावरही समाधानकारक उत्तर मिळत नाही.

या घटनेची बिहार सरकारने दखल घेतली असून लवकरच त्याबाबत पावले उचलली जातील, असे तेथील मंत्री संजय झा यांनी सांगितले. सुशांतसिंह यांच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी जेव्हा जाबजबाब घेतले, तेव्हा त्यांचे वडील के. के. सिंह यांनी यांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात फिर्याद दिली नाही. सुशांतसिंह याच्या खात्यातून कोट्यवधी रुपये काढले, सुशांतसिंहला ओव्हरडोस देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडीलांनी आता केला आहे. त्याचाच आता बिहार पोलिस तपास करीत आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सुशांतच्या वडीलांनी कोणतीही तक्रार केली नव्हती, असे म्हटले आहे; परंतु सुशांतच्या वडीलांनी २५ फेब्रुवारी रोजीच तक्रार केली असून मुंबई पोलिसांनी तिची दखल घेतली नाही.

सुशांतला रिया आणि तिच्या नातेवाइकांनी बंदीवान बनविल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीची दखल घेतली नसेल, तर त्याचवेळी सिंह यांनी बिहार पोलिसांकडे का तक्रार केली नाही, असा प्रश्न उरतोच. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते शहाजी उपाम यांनी सांगितले आहे की, त्याच्या वडीलांकडून किंवा कुटुंबाकडून पोलिस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार आली नाही; परंतु कुटुंबातील सदस्याने संदेशाद्वारे जर त्याबाबतची माहिती दिली असेल, तर त्याची मुंबई पोलिसांनी दखल घ्यायला हवी होती. व्हाॅटस्ॲपद्वारे मुंबई पोलिसांकडे तक्रार केली, हा औपचारिकतेचा भाग आहे. मुलाच्या जीवाला धोका असेल, तर प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद का दिली नाही, याबाबत कुणीच काही बोलत नाही. या मेसेजमध्ये म्हटले आहे, की रियाच्या कुटुंबीयांनी सुशांतला औदासिन्यावर उपचार करण्याच्या नावाखाली काही महिन्यांपर्यंत रिसॉर्टमध्ये ठेवले होते. या मेसेजमध्ये सुशांतच्या वर्गमित्राचा उल्लेख होता.

मुंबई पोलिसांनी के. के. सिंह यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. मुंबई पोलिसांच्या वतीने उपायुक्त शहाजी उपम यांनी, सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतचा मेहुणा आणि हरयाणा पोलिसात आयपीएस ओपी सिंह यांनी काही व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवले होते. या प्रकरणात तत्कालीन डीसीपीने त्यांना सांगितले होते, की जर आपण लेखी तक्रार दिली, तर मुंबई पोलिस पूर्णपणे सहकार्य करतील. तथापि, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अनौपचारिकरित्या कारवाई करावी, अशी त्यांची इच्छा होती, जे शक्य नव्हते. तपासात मुंबई पोलिस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला. सुशांतच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणी सातत्याने होत आहे; पण महाराष्ट्र सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, की यापूर्वी या तिन्ही बहिणी आणि वडीलांनी त्यांच्या निवेदनावर कधीही शंका उपस्थित केली नव्हती. ईडीही या प्रकरणातच स्वतंत्र तपास करीत आहे.

ईडीने सुशांतसिंह राजपूत यांचे सीए संदीप श्रीधर यांची चौकशी केली आहे. चाैधरी यांनी रियाने १५ कोटी रुपये हस्तांतरित करण्याइतके पैसेच खात्यात नव्हते, असे म्हटले आहे. सुशांतसिंहच्या खात्यातून तीन कोटी रुपये रियाने काढून घेतले, असाही एक आरोप आहे.  रिया चक्रवर्ती यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचा पुरावा मिळालेला नाही. बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही, असे परमवीर सिंग यांनी म्हटले आहे.मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांची निवेदने नोंदविली आहेत. रिया चक्रवर्ती यांची दोनदा चौकशी केली गेली. फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉक्टर यांच्या टीमचा सल्ला घेण्यात आला आहे. आम्ही अद्याप निकालावर पोहोचलो नाही. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोघांचा तपास केला जात आहे, असे पोलिस आयुक्तांनी निदर्शनास आणले. तपासादरम्यान अभिनेताच्या घरी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे जाबजबाब 16 जून रोजी घेण्यात आले. यामध्ये त्याच्या बहिणी आणि वडीलांचा समावेश आहे.

इतकेच नव्हे तर त्याचे मेहुणे सिद्धार्थ आणि ओपी सिंग यांचीही निवेदने नोंदविण्यात आली. त्यांच्या निवेदनात कुणीही खुनाचा संशय व्यक्त केला नाही. मुंबई पोलिसांनी त्याच्या बहिणींना पुन्हा चौकशीसाठी बोलवले होते; परंतु त्या पुन्हा आल्या नाहीत. बिहार पोलिसांच्या तपासावर कायदेशीर मत मागविले जात आहे. सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन आधीच आधीच तणावात होती. त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. सुशांतच्या घरी पार्टी झाल्याची बाब अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त केले आहेत. तथापि, तेथे कोणताही पुरावा मिळालेला नाही. ‘सोशल मीडिया’वर सुरू असलेल्या यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग असल्याची चर्चा चुकीची आहे. हा सर्व प्रकार पाहिला, तर बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांना एकमेकांच्या विरोधात झुंजविण्याचा आणि काहीतरी लपविण्याचा प्रयत्न यातून दिसतो आहे. कथानकाला इतकी उपकथानके जोडली गेली आहेत, की त्यामुळे संभ्रमच निर्माण होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here