Home crime Shrigonda : लॉकडाउनच्या आश्रयाने शहरात अवैध धंद्यांत वाढ…

Shrigonda : लॉकडाउनच्या आश्रयाने शहरात अवैध धंद्यांत वाढ…

हातभट्टी, जुगार, मटका राजरोसपणे सुरू

प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा तालुक्यासह शहरातील विविध भागात कोरोना प्रादुर्भावातील लॉकडाऊनचा आश्रय घेत, अवैध धंदे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने स्थानिक प्रशासन संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय उपयोजना राबवत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन सामन्य लोकांवर संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून, कारवाई करीत सर्व लक्ष आजाराचा प्रादुर्भाव किंवा संक्रमण रोखण्यात गर्क असतांना, पोलीस प्रशासनाच्या पीठ पीछे किंवा नाकावर टिच्चून जुगार, मटका, हातभट्टी आणि असे बरेच अवैध व्यवसाय जोर धरत आहेत. लॉकडाऊन किंवा कोरोना प्रादुर्भावाचा फायदा घेत, श्रीगोंदा कार्यक्षेत्रात अवैध धंदे पोसत चालले असल्याचे स्थानिकांकडून समजले आहे.

श्रीगोंदा शहरातील चंद्रमा पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये जुगार खेळण्यासाठी तालुक्यातून तसेच शहरातील नामांकित व्यक्ती जमत असून, लाखो रुपयांची उलाढाल गैर माध्यमातून या ठिकाणी होत असल्याची अधिकृत माहिती समजली आहे. जुगार खेळण्यासाठी जमणारे जुगारी कोरोना आजार रोखण्याचे  सर्व नियम पायदळी तुडवत, गर्दी करून तोंडाला मास्क न लावता जुगार खेळत असल्याचे समजले आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा – पारगाव रोडवरील एका हॉटेलमध्येही अशाच प्रकारे जुगारी आपला डाव मांडत आहेत.

मुळात अशा पद्धतीने जुगार खेळणे अवैध असून, त्यावर स्थानिक पोलिसांची कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, पोलीस दखल घेत नसल्यामुळे या हॉटेल आणि अवैध धंद्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी माध्यमांना फोन करीत सदर प्रकार कळविला आहे. कोरोना लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अवैध धंदे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जोमाने चालू असून, कोरोना प्रादुर्भावास नमूद अवैध धंदे कारणीभूत ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

याप्रमाणेच श्रीगोंदा शहरातील काही भागांमध्ये गावठी हातभट्टी तयार करून विक्री केली जात आहे. येथेही अनेक ठिकाणांवरून येणारे लोक दारू पिण्यासाठी एकत्र येत कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यासाठी निमित्त ठरत आहेत. याकडेही श्रीगोंदा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असून, अनेकांनी याविषयी श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बीट अंमलदार यांना वारंवार माहिती दिली असूनही, कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासन या अवैद्य व्यवसायीकांपुढे का नमते आहे ? हे मात्र, समजू शकले नाही.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here