चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचार्‍याचा मृत्यू

6 महिन्यांपासून वेतन नसल्याने तणाव
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
चंद्रपूर : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात एका महिला कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने ही महिला तणावाखाली होती. नवजात शिशू कक्षात काम करत असताना ही महिला अचानक कोसळली. त्या ठिकाणी कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने त्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करत मृताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात एक महिला कंत्राटी सहाय्यक पदावर काम करायची. काल नवजात शिशूच्या अतिदक्षता विभागात काम करत असताना ती अचानक खाली कोसळली. त्यानंतर तिला आयसीयूत दाखल करण्यात आले. पण रात्रभर एमडी, एमएस किंवा कोणतेही स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध झाले नाही. दुर्देवाने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांची ही परिस्थिती असेल तर इतर रुग्णांचे काय? असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत. या दवाखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी स्पेशलिस्ट डॉक्टरला कॉल करूनही ते लवकर हजर होत नाहीत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न कंत्राटी कामगारांच्या संघटनेने केला आहे.
तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी रात्री स्पेशलिस्ट डॉक्टरांना कॉल केला का ? केला असेल तर डॉक्टर का आले नाही ? रूग्णावर तातडीने कोणते उपचार केले याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here