Shrigonda : पिंपळगाव पिसा महाविद्यालयाला विज्ञान, वाणिज्य या नवीन विद्याशाखा आणि एमए अर्थशास्त्र हा नवीन विषय सुरू करण्यास मंजुरी 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उक्कडगाव – कुकडी शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई कला महाविद्यालय, पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा येथे विज्ञान व तंत्रज्ञान तसेच वाणिज्य व व्यवस्थापन या नवीन विद्याशाखा आणि एम. ए. अर्थशास्त्र हा नवीन विषय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली. यामुळे पिंपळगाव पिसा परिसरातील तसेच श्रीगोंदा तालुक्यातील आडवळणी गावातील मुलामुलींच्या शिक्षणाची गैरसोय थांबणार आहे.   
कर्मयोगी स्व. कुंडलिकराव जगताप पाटील यांच्या दूरदृष्टीतून सावित्रीबाई कला महाविद्यालय हे 1999 पासून कार्यरत आहे. परंतु अशा नवीन विद्याशाखा आणि एम. ए. इ. शाखांची मागणी पिंपळगाव परिसरातील पालकांकडून वारंवार होत होती. विशेष करून मुलींना श्रीगोंदा आणि अहमदनगर या ठिकाणी जाणे अडचणीचे होते. त्यामुळे मा.आमदार राहुल कुंडलिकराव जगताप पाटील यांच्या जनकल्याण दृष्टीच्या प्रयत्नाने पिंपळगाव पिसा परिसरात कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना आता शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे.
त्यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील मुलामुलींची उच्चशिक्षणाची गैरसोय दूर होऊन कला, वाणिज्य, आणि विज्ञान या तीनही शाखांमध्ये शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. ढगे व उपप्राचार्य डॉ. शांतीलाल घेगडे यांनी नुकतीच दिली. ग्रामीण भागातील मुला मुलींची सोय या महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य या विद्याशाखांमध्ये आणि एम.ए.अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here