!! भास्करायण !! श्रीरामप्रभूंनी पुन्हा अवतरावे…

0

भास्कर खंडागळे ,बेलापूर (९८९०८४५५५१ )

श्रीरामप्रभुंच्या मंदिराचा पंतप्रधानांच्या हस्ते काल भुमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. श्रारीमप्रभु म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची अस्मिता.श्रीराममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त रामप्रभूंना वंदन करु.

पृथ्वीतलाला ‘रावण’ नामक राक्षसाने सळो की पळो करुन सोडले.प्रभूरामांनी रावणाचा खात्मा केला. मात्र झालंय काय की, श्रीरामप्रभूंनी लंकेत मारलेल्या रावणाचा पुनर्जन्म झालाय! तो ही चक्क आपल्याच देशात. तुम्ही म्हणाल आमचं डोकंबिकं फिरलयं कां? तर नाही. आम्ही चक्क शुध्दीवर आहोत आणि सारासार विचार करुनच बोलत आहोत. रावणाचा पुनर्जन्म झालाय आणि तोही रामप्रभूंच्या भारत देशात? जरा आपल्या देशावर एकदा नजर फिरवा म्हणजे आम्ही वेडे की शहाणे ते समजेल. दशमुखी रावणाला रामप्रभूंनी लंकेत कायमचं गाडलं हो. पण या मेलेल्या दशमुखी रावणांच्या दहा तोंडांनी वेगवेगळ्या रुपाने विविध ठिकाणी जन्म घेतलाय.

पहिलं तोंड भ्रष्टाचार, दुसरं निर्दयीपणा, तिसरं अनिती, चौथं गुन्हेगारी, पाचवं अमानवता, सहावं अधर्म, सातवं विकृती, आठवं स्वार्थ व आपमतलब, नववं पाशवीकरण सर्वात शेवटचं दहावं आणि सगळ्यात भयानक तोंड म्हणजे बोकाळलेला ‘चंगळवाद व भोगवाद’! आता सांगा रावण जिवंत आहे की मेला?दश दृष्टप्रवृत्तीची लाखो तोंडं ‘आ’ वासून आपल्यासमोर उभी ठाकलीत. !
अशा कलियुगी रावणाचा पुनर्जन्म झालायं; पण वाचवायला ‘श्रीराम’ येणार कुठून? आता तुमच्या आमच्यातच ‘राम’ राहिला नसेल, तर श्रीराम येतील कसे? श्रीरामप्रभूंना काय तेवढ एकच काम आहे? रावण जन्माला आला की घे अवतार काढ रामबाण, लाव धनुष्याला अन संपव रावणाला. तुम्ही – आम्ही रामसेवक, रामभक्त कशाला आहोत? फक्त रामनामाचा जप करीत बसायला?

भाऊंनो, आता रामप्रभू अवतार घेतील आणि रावणापासून वाचवतील, असा समज असेल तर विसरा.
बरं, दुसरं असं की आता श्रीरामप्रभूंनी जन्म घ्यायचा म्हटलं तरी तो कोणाच्या भरवशावर घ्यायचा? रामायण काळात सितामाई होत्या, जीवाला जीव देणारे लक्ष्मण-भरतासारखे भाऊ होते, जीवाची बाजी लावून निष्ठेने लढणारे हनुमान आणि वानरसेना होती. आता यातलं काय उरलयं? नाही म्हणजे आम्ही खोटं बोलत असू, तर आमचा कान पिरगळा. तुम्ही तरी खरं सांगा दशरथ, कौशल्या, लक्ष्मण, भरत, सितामाई, हनुमंत यातलं कोण शिल्लक राहिलंय? यातलं कोणी दिसतं आपल्या समाजात? आता सांगा, कोणाच्या भरवशावर श्रीरामांनी अवतार घ्यायचा?

दशरथ-कौशल्या आपण पाठवितो वृध्दाश्रमात, लक्ष्मण-भरत सिहांसनासाठी थोरल्या भावाला ढकलायला कमी करीत नाही. थोरला या पार्टीत तर धाकटा विरोधी पार्टीत अशी लक्ष्मण-भरताची अवस्था! आता तर सत्ता आणि संपत्तीसाठी भावा-भावातील स्पर्धा याच्याही पुढे जावून ‘जिवघेणी’ बनलीय. हे झालं भावाचं. जीवाला जीव देणारे ‘हनुमानासारखे’ वीर व विश्वासू साथीदार तर नावाला शिल्लक नाही. मित्र, मित्र म्हणतील आणि कधी केसानं गळा कापतील याचा नेम नाही. मतलबापुरती यारी बाकी सगळी गद्दारी. जीवाला जीव देणारे हणुमंत नसतील ,तर वानरसेना तरी कुठून मिळणार? आजच्या वानरसेनेबद्दल बोलायलाच नको. हम तुम्हारे साथ है म्हणतील. ‘‘सेतू बांधारे सागरी’’ म्हणतील; अन् सेतू बांधण्यासाठी उचललेले दगड गुपचूप पळवतील! याच पळविलेल्या दगडावर श्रीरामाच्या नावाच्या जागी आपले नाव टाकून आपल्या घराचा बंगल्याचा नाही तर कॉम्प्लेक्सचा पाया भरतील!

राहता राहिल्या आजच्या ताईसाहेब! त्यांना तरी कुठयं सवड? समजा चुकून आजचे श्रीमान पतीदेव वनवासात निघालेच, तर आजच्या ताई म्हणतील ‘‘काय बाई कटकट. सासूबाई बोलल्या अन् हे निघाले लगेच! ज्याचं त्याच वाटून द्यायचं अन् मिटवून घ्यायचं ते दिलं सोडून अन् निघाले वनवासात. काय तर म्हणे मातोश्रींची आज्ञा! नशिबच फुटकं. ‘‘अशाही स्थितीत पतीदेव आजच्या ताईसाहेबांना वनवासात सोबतीला चला म्हणतील तर सितामाईचं पित्त खवळणार. ‘‘तुम्ही पुढं व्हा. मी ह्या सिरियलचे सगळे एपिसोड संपले की मग घर सोडते अन् तुम्हाला शोधीत शोधीत येते, तोपर्यंत एस.एम.एस. पाठवित रहा!”

असं हे आजचं रामायण श्रीरामप्रभूंच्या जन्मदिनी आम्हाला रामायणातले एकवचनी, एकबाणी, एक पत्नी, आदर्श राजा प्रभूरामचंद्र आठवले. त्यांच्यावर निष्ठा ठेवणार्‍या प्रतिव्रता सितामाईंची याद आली. सिंहासन आणि सत्ता लाथाडून जीवाला जीव देणारे भरत-लक्ष्मण जीवाची बाजी लावून आणि खांद्याला खांदा लावून लढणारे हनुमंत आणि त्यांचे निष्ठावंत वानरसेना डोळ्यासमोर तरळली. त्याच वेळी आज जिकडे-तिकडे बोकाळलेले, मोकट सुटलेले रावण आपल्या भोवती फेर धरलेले दिसताहेत. त्यात आपल्यातला ‘राम’ हरवला म्हणून तर रावण अधिकच उतले आहेत, मातले आहेत. हे सगळं बघून आमचं मन बधीर झालं आणि आम्ही हे कलियुगी रामायण लिहीलं.श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने देशातील कलियुगी रावण गाडला जावा आणि रामराज्य पुन्हा अवतरावे,हिच प्रभूराम चरणी आजच्या शुभदिनी प्रार्थना.जय श्रीराम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here