नागरिकांना मिळणारे फुकटचे रेशन गेले कुठे ?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाचे संकट मार्च महिन्यात दाखल झाले. तेव्हाच शासनाने प्रति माणसी 5 किलो फुकट तांदूळ, गहू देण्याची योजना राबवली. त्यामुळे गरिबांच्या ताटात घास दिसू लागला होता. मात्र, गेल्या जुलै महिन्यात श्रीगोंदातालुक्यात मोफत धान्य वाटप झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समजतो आहे. अगोदर लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद, रोजगार बंद आहे. त्यात मोफत होणारे रेशन धान्य वाटप बंद असल्याने गरिबांच्या घरातली चूल पेटणार कशी? असा सवाल सर्वसामान्य विचारू लागले आहेत. दुकानावर म्हणतात वरून धान्यच आले नाही, तर लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

संकटे आणि म्हणजे एकामागून एक येतात. कोरोनाचे संकट सगळ्या संकटांना सोबत घेऊन आले आहे. 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाले त्यानंतर शासनाने सर्वसामान्य नागरिकांना मोफत 5 किलो गहू तांदूळ, धान्य देण्याची योजना सुरू केली. त्या योजनेमुळे ज्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत, ज्यांचा रोजगार थांबला आहे, अशा गरिबांना या योजनेचा फायदा झाला.  प्रत्येक रेशन दुकानातून मोफत रेशनचे वाटप करण्यात येत होते. गावोगावी त्याचे पुरवठा विभागाकडून नियोजन झाले होते. मात्र, जुलै महिन्यात या मोफत धान्याचा एक कणही वाटप झाला नसल्याचा प्रकार काही नागरिकांनी माध्यमांशी बोलताना पाढा वाचला आहे.

सध्या अनेक जण कोरोनामुळे घरीच आहेत. रेशनच्या धान्यावर कसेबसे त्यांच्या कुटूंबाची गुजराण होत होती. मात्र, जुलै महिन्यात धान्य वाटप झाले नसल्याने अनेकांनी रेशन धान्य दुकानदारांकडे विचारणा केली तेव्हा या महिन्यात धान्य आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थी निराश होऊन आपले जीवन जगत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नियम बदलून माणसी 5 किलो गहू, तांदूळ दिला जाणारा हा फक्त केवळ तांदूळ दिला जात होता. आता नव्याने 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याचा प्रस्ताव पुरवठा विभागाचा आहे. परंतु मोफत वाटप होणारे धान्य आणि बीपीएल वरच्या रेशन कार्ड धारकांना ही रेशनचे धान्य वाटप झाले नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे रेशन दुकानावर मोफत धान्य कधी मिळणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष
सध्या लॉकडाऊनमध्ये लोकांना फक्त जगण्यासाठी आधार हवा आहे आणि त्याकरता जेवणाच्या ताटात शिधा हवा आहे. हाताला रोजगार, कामधंदा नसल्याने मोफत रेशनचा आधार होता तो ही जुलै महिन्यात मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून गत महिन्यात काहीच का कार्यवाही केली नाही. रेशन दुकानदारांनी पैसे भरून ही त्यांना रेशनचे धान्य पोहचले नसल्याचे समोर येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अक्षम दुर्लक्ष होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here